वरच्या मजल्यावर घर हवे, मोजा अधिक पैसे; सिडकोची २६ हजार घरांची योजना : ७ ऑक्टोबरला प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 08:37 AM2024-10-04T08:37:13+5:302024-10-04T08:37:26+5:30
CIDCO Lottery 2024: सिडकोच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या गृहयोजनेचा ७ ऑक्टोबरला शुभारंभ होत आहे.
- कमलाकर कांबळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सिडकोच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या गृहयोजनेचा ७ ऑक्टोबरला शुभारंभ होत आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना असणार आहे. शहराच्या विविध नोडमध्ये या घरांचे बांधकाम सुरू आहे. यातील घरांच्या किमती मजल्यानुसार आकारल्या जाणार आहेत. वरच्या मजल्यावरील घरांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत यासंबंधीच्या ठरावाला मान्यता मिळाली आहे. सिडकोच्या माध्यमातून २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी मिळाली आहे. यातील २६ हजार घरांची सोडत ७ ऑक्टोबरला होणार आहे.
मजल्यानुसार दर
बावीस मजली टोलेजंग इमारतींतील घरांच्या किमती मजल्यानुसार निश्चित होणार आहेत. सातव्या मजल्यावरील घरासाठी प्रति चौरस फूट १० रुपये अतिरिक्त आकारणी होणार आहे. त्यावरील मजल्यासाठी प्रति चौरस फुटाला रुपये दहाच्या पटीने म्हणजेच २०, ३०, ४० असे चढ्या दराने अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
शिल्लक घरांचा समावेश
१३ हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, तर उर्वरित १३ हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. यातील सर्वाधिक जवळपास ५० टक्के घरे एकट्या तळोजा नोडमधील आहेत. त्याचबरोबर खांदेश्वर, मानसरोवर तसेच खारकोपर आणि बामणडोंगरी गृहप्रकल्पांतील शिल्लक घरांचा या योजनेत समावेश केला आहे. ही सर्व घरे बाजारभावाच्या तुलनेत कमी असणार आहेत. जुईनगर, वाशी, खारघर या प्रकल्पांतील घरांचा या योजनेत समावेश केलेला नाही.
सर्वात मोठी गृहयोजना
५० वर्षांत सिडकोने वेगवेगळ्या गृहयोजनांच्या माध्यमातून विविध घटकांसाठी जवळपास दीड लाख घरे बांधली आहेत. २०१८ मध्ये दोन टप्प्यांत जवळपास १८ हजार घरांची योजना जाहीर केली होती. आतापर्यंतची ती सर्वांत मोठी गृहयोजना ठरली होती. आता २६ हजार घरांची योजना जाहीर होत आहे.