नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग (पॅनेल) पद्धत रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये याविषयी विधेयक मंजूर केले जाणार आहे. यामुळे मंगळवारी होणारी नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडतही स्थगित केली असून त्याविषयी पत्र निवडणूक विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी १७ डिसेंबरला आरक्षित प्रभागांसाठीची सोडत काढली जाणार होती. याविषयी पालिकेने यापूर्वीच वर्तमानपत्रामध्ये जाहीरात प्रसिद्ध केली होती. सकाळी दहा वाजता विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये याविषयीची कार्यवाही केली जाणार होती. यानंतर २० डिसेंबरला प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणारहोते. २० ते ३० डिसेंबर दरम्यान प्रभाग रचनेवर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार होत्या. प्रशासनाने आरक्षणासाठीची कार्यवाही सुरू केल्यानंतर प्रभाग पद्धतीनेच निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यास सुरवात झाली होती. काँगे्रस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा प्रभाग पद्धतीला विरोध होता. प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली तर त्याचा लाभ भाजपला होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. यामुळे तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे एकसदस्यीय पद्धतीनेच निवडणूक घेण्याचे आवाहन केले होते. यासाठी निवेदनेही दिली होती व शिष्टमंडळासह नेत्यांची भेटही घेतली होती.राज्यातील इतर महापालिकांमध्येही शिवसेनेसह दोन्ही काँगे्रसच्या पदाधिकाºयांनी प्रभाग पद्धतीला विरोध करण्यास सुरवात केली होती. नवीन सरकारने तातडीने प्रभाग पद्धत रद्द करण्यासाठीची कार्यवाही सुरू करून हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला.राज्य शासनाच्यावतीने याविषयी पत्र निवडणूक विभागाकडेही दिले होते. निवडणूक विभागाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना याविषयी पत्र पाठवून आरक्षीत प्रभागांची सोडत पुढे ढकलण्याचे स्पष्ट केले आहे.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२० करिता सोडत काढणेव प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागविण्यासाठीचे वेळापत्रक देण्यात आले आहे. १७ डिसेंबरला नागरीकांचा मागास प्रवर्ग, महिला यांचेकरीता आरक्षित जागा निश्चित करण्याकरीता सोडत काढावयास सुचविले होते.सदर सोडत प्रक्रिया रद्द करण्यात येत असून या संदर्भात पुढील कार्यवाहीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असे निवडणूक विभागाने आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.महाविकास आघाडीमध्ये उत्साहनवी मुंबईमध्ये शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी एकत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. प्रभाग पद्धत महाआघाडीसाठी डोकेदुखीची ठरणार होती. कारण काही प्रभागामध्ये मतदारांना तीन वेगवेगळ्या चिन्हावर मतदान करावे लागणार होती. हात,घड्याळ व धनुष्यबाण अशा तिन चिन्हावरील उमेदवाराला एकाच वेळी मतदान करताना गोंधळ होण्याची शक्यता आहे. यामुळे तिनही पक्षांनी एकसदस्यीय पद्धतीला पसंती दिली होती. त्यासाठी पाठपुरावाही सुरू केला होता. मंगळवारी होणारी आरक्षण सोडत रद्द होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत.भाजपला घेरण्याची रणनीतीनवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला विशेषत: आमदार गणेश नाईक यांना घेरण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून सुरू आहे. नाईकांच्या ताब्यातून महापालिका मिळवायचीच असा निर्धार करण्यात आला आहे. प्रभाग पद्धत भाजपसाठी लाभदायक असल्यामुळे महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांचा याला विरोध होता. प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली तर भाजप पूर्ण बहुमत मिळवू शकेल असेही खाजगीत काहीजण सांगू लागले होते. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येताच प्रभाग पद्धत रद्द करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धत रद्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:25 PM