आंदोलनाचा इशारा : अवैध पार्किंगच्या कारवाईकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:45 AM2019-12-26T01:45:16+5:302019-12-26T01:45:24+5:30
आंदोलनाचा इशारा : रस्त्यांवर उभ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका
नवी मुंबई : तुर्भेतील इंदिरानगर परिसरात रस्त्यांवर होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे अपघातांचा धोका उद्भवत असतानाही वाहतूक पोलिसांसह पालिकेचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त होत असून, उपोषण करून आंदोलन छेडण्याचा इशारा स्वावलंबी सामाजिक सेवा भावी संस्थेने दिला आहे.
एमआयडीसी क्षेत्रांतर्गतचे रस्ते अवैध पार्किंगने व्यापले आहेत. रासायनिक साठा असलेले टँकर तसेच इतर अवजड वाहने रस्त्यांवरच दिवस-रात्र उभी केली जात आहेत. यामुळे रहदारीला अडथळा होत असून, पादचाऱ्यांचे अपघातही घडत आहेत. त्यामुळे तुर्भे नाका ते इंदिरानगर दरम्यान रस्त्यांवर होणाºया अवैध पार्किंगवर कारवाईची मागणी सातत्याने होत आहे. त्यासंदर्भात स्वावलंबी सामाजिक सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी पालिका व वाहतूक पोलिसांकडे मागणीही केली आहे; परंतु रस्त्यांलगत चालणारे गॅरेज व ज्या कंपन्यांचे टँकर रस्त्यावर उभे केले जात आहेत, त्यांच्या पाठीशी राजकीय वरदहस्त असल्याने कारवाईकडे चालढकल होत
आहे. यामुळे येत्या काही दिवसांत तिथल्या अवैध पार्किंगवर कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी वाहतूक पोलिसांसह पालिकेला दिला आहे.