कामगार लावताहेत कचऱ्याला आग!
By Admin | Published: March 29, 2016 03:06 AM2016-03-29T03:06:08+5:302016-03-29T03:06:08+5:30
वाशी ते पनवेल दरम्यानच्या रेल्वे स्थानकांची साफसफाई केल्यानंतर कचरा त्याच परिसरात जाळला जात आहे. यामुळे रेल्वे पटरीजवळील गवत व वृक्षांनाही आग लागत आहे.
नवी मुंबई : वाशी ते पनवेल दरम्यानच्या रेल्वे स्थानकांची साफसफाई केल्यानंतर कचरा त्याच परिसरात जाळला जात आहे. यामुळे रेल्वे पटरीजवळील गवत व वृक्षांनाही आग लागत आहे. रोजच हा प्रकार होत प्रदूषणही वाढत आहे.
नवी मुंबईमध्ये सिडकोने अत्याधुनिक रेल्वे स्टेशन उभारली आहेत. स्टेशन व परिसरातील साफसफाई करण्यासाठी ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. ठेकेदार साफसफाई करतात व सर्व कचरा स्टेशनच्या बाहेरील मोकळ्या जागेवर टाकून जाळला जातो. कचऱ्याला आग लावताना ती पटरीजवळील गवत व झुडपांनाही लागत आहे. सोमवारी वाशी ते सानपाडा दरम्यान अशीच आग लागली. दोन दिवसांपूर्वी सानपाडा स्टेशन ते दत्तमंदिर दरम्यानही गवताला आग लागली होती.
महापालिका, रेल्वे व सिडको प्रशासनाने ठेकेदाराला समज द्यावी. कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे. रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात येणाऱ्या आगीकडे ठेकेदारही दुर्लक्ष करत आहेत. जवळपास दहा वर्षांपासून कचरा जाळण्याचा प्रकार सुरू आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या समोरच हा प्रकार सुरू असतानाही कोणीच आक्षेप घेत नाहीत. कचऱ्याला आग लावण्याच्या घटना थांबल्या नाहीत तर पोलीस ठाण्यात व महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा पर्यावरणप्रेमी कृष्णा शेलार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)