हॉटेलचे टाकाऊ अन्न रस्त्यावर, स्वच्छ भारत अभियानाला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:33 AM2018-10-01T03:33:33+5:302018-10-01T03:33:47+5:30
दुर्गंधीने नागरिक त्रस्त : स्वच्छता अभियानाचा फज्जा
नवी मुंबई : हॉटेल्स व कॅटरिंग व्यावसायिकांकडून टाकाऊ अन्न रस्त्यावर अथवा कचराकुंडीच्या भोवती टाकले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असून, भटक्या कुत्र्यांसह उंदरांनाही त्याठिकाणी आश्रय मिळत आहे; परंतु स्वच्छता अभियानाला खो घालणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात बहुतांश ठिकाणचे रस्तेच कचरा कुंड्या बनले आहेत. परिसरातील कचरा, कचरा कुंडीत टाकताना कुंडी भरल्यानंतरही तो त्याचठिकाणी टाकला जात आहे. यामुळे कुंड्यांमधील कचरा रस्त्यांवर पसरत आहे. या कचºयात हॉटेल्स व कॅटरिंग व्यावसायिकांकडून टाकल्या जाणाºया टाकाऊ अन्नाचाही समावेश दिसून येत आहे. यामुळे कचरा कुंडीच्या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत पालिकेकडून घरोघरी जनजागृती करण्यात आलेली आहे. मात्र, त्यात हॉटेल्स व्यावसायिकांचा समावेश होत नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार आहे. मात्र, त्यांच्याकडून रस्त्यावर अथवा कचरा कुंडीत टाकल्या जाणाºया अन्नामुळे ते खाण्यासाठी त्याठिकाणी भटके कुत्रे, कावळे मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत, तर अशा ठिकाणी घुशी व उंदरांचेही साम्राज्य आढळून येत आहे. परिणामी लगतच्या रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे; परंतु अशा हॉटेल व कॅटरिंग व्यावसायिकांवर पालिका कारवाईत चालढकल करत असल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे. नागरिकांच्या नजरेतून लपवण्यासाठी रात्रीच्या वेळी हे टाकाऊ अन्न त्याठिकाणी टाकले जाते; परंतु दुसºया दिवशी दुपारपर्यंत हा कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर पडून राहिलेला कचरा व त्यामधील टाकाऊ अन्न यापासून दुर्गंधी पसरत आहे. घणसोलीत टाकल्या जाणाºया कचºयाने परिसराला बकालपणा आला आहे. त्यामुळे कारवाईची मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील यांनी केली आहे.