नियोजनाअभावी कोट्यवधी वाया,जलवाहिनीसाठी काँक्रिटच्या रस्त्याचे पुन्हा खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 02:49 AM2018-02-05T02:49:05+5:302018-02-05T02:49:09+5:30
पनवेल शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.
पनवेल : पनवेल शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र शहरात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणासाठी खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याने स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पनवेल शहरात उरण नाका रोडवर शनिवारी खोदकाम करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेल्या या रस्त्याचे अवघ्या काही महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यावर शनिवारपासून खोदकामास सुरुवात करण्यात
आली.
पनवेल महपालिकेकडून स्वच्छ, सुंदर शहरासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यात स्वच्छ शहराबरोबरच सुशोभीकरणावरही भर दिला जात आहे. शहरातील भिंती रंगविण्यात आल्या आहेत. मात्र स्मार्ट सिटी म्हणून शहराचा विकास करताना नियोजनातील त्रुटीमुळे कधी केबल टाकण्यासाठी तर कधी जलवाहिनी, भूमिगत वीजवाहिन्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर खोदकाम केले जात आहे.
>रस्ते बांधण्यापूर्वी
परिसरातील जलवाहिनी, वीजवाहिन्यांबाबत योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. मात्र नियोजनात त्रुटी राहिल्याने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या रस्त्यांवर खोदकाम होताना दिसत आहे. यासंदर्भात पनवेल महालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांच्याकडे विचारणा केली असता, सध्या परिसरातील खोदकाम थांबविल्याचे त्यांनी सांगितले.
>खारघर-तळोजा रस्त्याची दुरवस्था
खारघर शहरातून तळोजा गावात जाणाºया रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे फारूक पटेल यांनी सिडकोचे खारघर विभागाचे प्रशासक सीताराम रोकडे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची विनंती केली आहे.
खारघर शहर स्मार्ट सिटी करण्याचा सिडकोचा मानस आहे. मात्र शहरालगत असलेली गावे, वाड्या अद्याप मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. तळोजा गावाकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच अंदाज न आल्याने वाहनांच्या अपघाताचाही धोका वाढल्याचे चालकांचे म्हणणे आहे. या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी न केल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा या वेळी पटेल यांनी दिला आहे.