कळंबोली : कामोठे वसाहतीत काही ठिकाणी मलनि:सारण वाहिन्यातील पाणी चेंबरमधून रस्त्यावर वाहताना दिसत आहे. त्याचबरोबर सर्वात मोठी अडचण सेक्टर ६ ए परिसरात निर्माण झाली आहे. या ठिकाणच्या जुही अपार्टमेंटचे सांडपाणी हे आजूबाजूला वाहत असल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत सिडको आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तर सोसायटीकडे पैसे नसल्याचे कारण सांगितले जात आहे.
कामोठे वसाहतीत सेक्टर ६ ए मध्ये प्लॉट क्रमांक ६३ ए येथे जुई अपार्टमेंट आहे. या सोसायटीचे संचालक मंडळ सिडकोच्या निबंधकांनी बरखास्त करून त्या ठिकाणी प्राधिकृत अधिकारी नियुक्त केलेआहेत. त्यांच्यामार्फ त जुही अपार्टमेंटचा कार्यभार पाहिला जातो; परंतु गेल्या एक-दीड वर्षापासून अंतर्गत मलनि:सारण वाहिन्या साफ करण्यात आल्या नसल्याने मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत, त्यामुळे हे सांडपाणी बाजूच्या मोकळ्या असलेल्या भूखंड ६४ वर साचले आहे. या ठिकाणी जणूकाय डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने डासांची उत्पत्ती होत आहे. याशिवाय बाजूच्या आनंद सरोवर, ड्रीम्स अपार्टमेंट, वैष्णवी, स्वराज यासारख्या सात सोसायट्यांना या पाण्याचा त्रास होत आहे. मलमिश्रित आणि सांडपाणी झिरपून ते आमच्या प्लॉटवर येत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याशिवाय दुर्गंधीही पसरल्याचे सदनिकाधारक सांगतात.
जुही अपार्टमेंटचा गलथान कारभार आजूबाजूच्या इमारतींना त्रासदायक ठरत आहे. याबाबत संबंधित यंत्रणांकडून कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही. यावरून स्वच्छ भारत अभियान हे फक्त बोलण्यापुरते आहे का? असा प्रश्न स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे. जुही अपार्टमेंटचे प्राधिकृत अधिकारी पी. बी. भजानावळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.महापालिका आणि सिडकोकडे पत्रप्रपंच सुरूस्थानिक रहिवाशांच्या वतीने आरपीआयचे कामोठा शहराध्यक्ष मंगेश धीवर हे जुही आपार्टमेंटच्या शेजारील इमारतीतील रहिवासी आहेत, त्यांनी जुही आपार्टमेंटमधील प्राधिकृत अधिकाऱ्यांची भेट घेऊन या बाबत तक्रार केली; परंतु सोसायटीकडे पैसे नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी महापालिकेकडे धाव घेतली; परंतु हा सिडकोचा प्रश्न असल्याचे तेथून सांगण्यात आले. सिडकोकडे पाठपुरावा केला असता ही सोसायटीतील अंतर्गत बाब आहे, असे उत्तर तेथून मिळाल्याचे धीवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.