उरणमध्ये लाखो लिटर पाणी वाया
By admin | Published: December 31, 2016 04:29 AM2016-12-31T04:29:21+5:302016-12-31T04:29:21+5:30
बोकडविरा गावानजीक उरण-पनवेल रस्त्याच्या बाजूने असलेली एमआयडीसी पाइपलाइन शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक फुटल्याने उच्च दाबाची पाइपलाइन असल्याने
उरण : बोकडविरा गावानजीक उरण-पनवेल रस्त्याच्या बाजूने असलेली एमआयडीसी पाइपलाइन शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक फुटल्याने उच्च दाबाची पाइपलाइन असल्याने बोकडविरा रस्त्यावर अगदी पाणीच पाणीच झाले होते. फुटलेल्या पाइपलाइनमधून लाखो लिटर्स पाणी वाया गेले.
उरण शहर आणि गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. जुनाट झालेल्या उच्च दाबाच्या जलवाहिन्या धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे के व्हाही फुटून लाखो लिटर्स पाणी वाया जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मुख्य जलवाहिनी फुटली. बोकडविरा गावासमोरील एमएसईबी कामगार वसाहतीजवळ आणि उरण-पनवेल रस्स्त्याच्या बाजूला असलेली एमआयडीसीची पाइपलाइन फुटल्याने पाण्याच्या धारा २० फुटांपर्यंत उंच उडत होत्या. प्रचंड दाबाने उडणाऱ्या पाण्यामुळे रस्ता आणि परिसर पाण्याने न्हाऊन निघाला होता. रस्त्यावरून जाणारी वाहने आणि वाटसरूही ओलेचिंब होत होते. प्रचंड वेगाने बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया गेले.
याची खबर मिळताच एमआयडीसीच्या पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांच्या अथक प्रयत्नातून फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यात आली. नुकतेच या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पाइपलाइन वेल्डिंग करण्यात आलेली लोखंडी पट्टी लिकेज झाल्याने पाइपलाइन फुटल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रणजीत विरंजे यांनी दिली. (वार्ताहर)