चोरट्यांची नजर कारमधील लॅपटॉपवर
By Admin | Published: January 19, 2016 02:25 AM2016-01-19T02:25:33+5:302016-01-19T02:25:33+5:30
सोनसाखळी, वाहनचोरीनंतर शहरात आता लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. गतवर्षी १११ गुन्हे घडले असून फक्त ७ गुन्ह्यांचाच उलगडा झाला आहे.
नामदेव मोरे , नवी मुंबई
सोनसाखळी, वाहनचोरीनंतर शहरात आता लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. गतवर्षी १११ गुन्हे घडले असून फक्त ७ गुन्ह्यांचाच उलगडा झाला आहे. लॅपटॉपची विक्री करणे सोपे असते व सापडण्याची शक्यता कमी असल्याने चोरट्यांनी हा सुरक्षित पर्याय शोधला आहे.
नवी मुंबई व दक्षिण नवी मुंबईची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. शहराच्या विकासाबरोबर येथील गुन्हेगारीचे स्वरूपही बदलू लागले आहे. दरोडा, घरफोडीपेक्षा फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. पोलीस तपासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेवू लागले आहेत. यामुळे अनेक गुन्ह्यांचा पटकन उलगडा होत असतो. यामुळे चोरट्यांनीही सुरक्षित मार्ग हाताळण्यास सुरवात केली आहे. मागील काही वर्षांमध्ये शहरात लॅपटॉप चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. चोरटे रोड, बँक, मॉल, हॉटेलबाहेरील कारची रेकी करत फिरत असतात. कारमध्ये लॅपटॉप दिसला की काच फोडून तेथून पळ काढला जातो. दोन मिनिटात चोरी करून पसार होता येते. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यामध्ये दागिने विकतानाही पकडले जाण्याची भीती असते. शिवाय ज्वेलर्सवाले कमी दराने दागिने घेतात. यापेक्षा चोरीच्या लॅपटॉपची विक्री करणे अत्यंत सोपे असते. १० हजारपासून ५० हजार रुपये किमतीलाही लॅपटॉप विकले जातात. मोबाइलप्रमाणे लॅपटॉपमध्ये चोरांना पकडण्यासाठीची यंत्रणा नसते. याचाच गैरफायदा चोरटे घेवू लागले आहेत.
लॅपटॉप चोरीच्या घटना वाढू लागल्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी या घटनांची स्वतंत्र नोंद करण्यास सुरवात केली आहे. २०१२ मध्ये १४७ लॅपटॉपची चोरी झाली होती. यामधील फक्त १५ गुन्ह्यांचाच तपास लागला होता. उघडकीस येणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण फक्त १० टक्के होते. २०१४ मध्ये १३२ गुन्हे घडले होते. यामधील २० गुन्ह्यांचा तपास लागला असून गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण १५ टक्के होते. २०१५ मध्ये १११ घटना घडून फक्त ७ गुन्ह्यांचा तपास लागला आहे. गुन्हे प्रकटीकरणाची
टक्केवारी फक्त ६ टक्के आहे. लॅपटॉपची चोरी केल्यानंतर सापडण्याची शक्यता खूपच कमी असल्यामुळेच चोरट्यांनी हा मार्ग निवडला आहे. नागरिक निष्काळजीपणे कारमध्ये लॅपटॉप ठेवतात. घराचा दरवाजा उघडा ठेवून हॉलमध्येच लॅपटॉप ठेवलेला असतो. हा निष्काळजीपणा चोरट्यांच्या पथ्यावर पडू लागला आहे.