खालापूरसाठी ‘जलयुक्त’ वरदान
By admin | Published: September 17, 2016 02:18 AM2016-09-17T02:18:25+5:302016-09-17T02:18:25+5:30
महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आणि तिचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातून झाला.
जयंत धुळप, अलिबाग
महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आणि तिचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातून झाला. जिल्ह्यात या योजनेचे अत्यंत सकारात्मक असे परिणाम साध्य होताना दिसून येत आहेत. २०१९ पर्यंत महाराष्ट्र जलसमृध्द करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण खालापूर तालुक्यास आता वरदान ठरले आहे.
संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण भरपूर असते. रायगड जिल्ह्यात साधारण५० हजार मि.मी. इतका पाऊस वर्षाला पडतो. पावसाळ््यात खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि ओढे नजरेला सुखद वाटतात. मात्र हे वाहून जाणारे पाणी कोकणातील जमिनीतच मुरले तर जमिनीतील पाण्याची पातळी वाढू शकते म्हणूनच जलयुक्त शिवार अंतर्गत गेल्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये ९४५ कामे पूर्ण करण्यात आली.खालापूर तालुक्यात चावणी व नडोदा या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे करण्यात आली. तर उंबरे, खानव, बोरगाव या गावातही योजनेंतर्गत कामे करण्यात येत आहेत. २०१५ च्या आराखड्यानुसार ५४ कामे प्रस्तावित होती. ही कामे ८१.४० हेक्टर क्षेत्रामध्ये राबविण्यात आली. सलग समतर चर, मातीचे बांध, सिमेंट नाले, शेततळे, जुन्या भातशेतीची दुरु स्ती, गाळ काढणे आदि कामांचा समावेश करु न योजनेला मूर्त स्वरु प देण्याचा प्रयत्न या भागात यशस्वी झाला. नडोदे परिसरात ६८.४८ हेक्टरमध्येही मातीचे बांध १२, सिमेंट नाला १, शेततळे ३, जुन्या भातशेतीची दुरु स्ती करण्यात आली असून सिमेंटचे बांध ३ ठिकाणी बंधारे तयार केले आहेत तर ६ बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला आहे.
खानव, उंबरे, बोरगाव खुर्द सोंडेवाडी या ३ गावांचा समावेश प्रस्तावित कामांमध्ये असून त्याचा आराखडा तयार झाला आहे. हा भाग काहीसा डोंगराळ असल्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी याचा विचार करण्यात आला आहे. खानाव हे जवळपास १८०० लोकवस्ती असलेले गाव. तर बोरगाव खुर्द सोंडेवाडीची लोकसंख्या जवळपास १२०० आणि उंबरेची लोकसंख्या जवळपास १७०० आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाईला पर्याय म्हणून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत या योजना राबविल्या जात आहेत. या ठिकाणी देखील सलग समतर चर, मातीचे बांध, सिमेंट नाले, शेततळे, जुन्या भातशेतीची दुरु स्ती, गाळ काढणे अशी कामे हाती घेतली जाणार आहेत. खानाव परिसरात एकूण ८१.५० हेक्टर, बोरगाव परिसरात ११५ हेक्टर भागात ही कामे केली जाणार आहेत.
एकूणच या जलशिवार योजनेमुळे या भागात झालेल्या कामांमुळे पाणीसाठा साचून तो जमिनीत मुरविण्यामध्ये बरेचसे यश मिळाले आहे. येत्या काही वर्षात या अभियानांतर्गत कामे पूर्ण झाल्यावर भूगर्भात पाणी जिरवून व जमिनीची धूप थांबविण्यात आणखीन मोठे यश मिळवून येथील पाणीटंचाई कायमची दूर होऊन २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्याच्या मोहिमेची सफलता होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.