नवी मुंबई : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी महापालिकेने निर्माण केलेल्या तलावांच्या देखभालीवर महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे तलावातील पाण्यात कपडे धुणे, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असून पाण्याचा गैरवापर केला जात आहे. निर्माल्य कलशांची दुरवस्था झाल्याने निर्माल्य तलावात टाकले जात असून, यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. या पाण्याला दुर्गंधी सुटली असून, त्यामुळे तलाव परिसरात येणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.
नवी मुंबई शहराला उद्यानांचे शहर म्हणून संबोधण्यात येते. शहरात तलावांची निर्मिती करताना, तसेच जुन्या तलावांचा पुनर्विकास करताना तलावांच्याभोवती देखील महापालिकेने हिरवळ, उद्याने, ज्येष्ठ नागरिक केंद्र, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी आदी सुविधा निर्माण केल्या आहेत; परंतु या परिसराची देखभाल होत नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तलावातील पाण्यात कपडे धुणे, अंघोळ करणे यासाठी बंदी घालण्यात आली आहे; परंतु तलावातील पाण्याच्या गैरवापरावर महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने नियमांची पायमल्ली केली जात आहे. शिरवणे येथील चिंचोली तलावात कपडे धुणे, अंघोळ करणे यासारखे प्रकार घडत आहेत. दिवाळीमुळे तलावाजवळील निर्माल्य कलशांजवळ मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले आहे. निर्माल्य कलशांची झाकणे तुटलेली आहेत त्यामुळे निर्माल्य कलशात टाकलेले निर्माल्य पुन्हा बाहेर पडत आहे. त्यामुळे कलशाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचले आहे. गणपती आणि देवी विसर्जनाच्यावेळी वापरण्यात आलेले लाकडी तराफे तलावातील पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले नाहीत. निर्माल्य कलाशाजवळ साचलेले निर्माल्य पाहून अनेक नागरिक निर्माल्य तलावातील पाण्यात टाकत आहेत. तलावातील पाण्याचा होणारा गैरवापर आणि निर्माल्य यामुळे तलावातील पाणी दूषित झाले असून या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे तलाव परिसरातील उद्यानात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तलाव परिसरात रात्री मद्यपी मद्यपान करत असून अनेक ठिकाणी मद्याच्या मोकळ्या आणि फुटलेल्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे पडले आहेत. सुरक्षारक्षक नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. तलाव परिसरात महापालिकेने स्वच्छता ठेवावी, तसेच या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.