जलसंवर्धनामुळे पूरनियंत्रण शक्य
By admin | Published: June 25, 2017 04:12 AM2017-06-25T04:12:34+5:302017-06-25T04:12:34+5:30
महाडमधील सावित्री नदीच्या पूरनियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शक्य आहे. तसेच उन्हाळ््यातही पाणीटंचाईवर मात करून बारमाही कृषी
जयंत धुळप ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : महाडमधील सावित्री नदीच्या पूरनियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शक्य आहे. तसेच उन्हाळ््यातही पाणीटंचाईवर मात करून बारमाही कृषी उत्पादनासाठी मोठे जलसंवर्धन येथे शक्य असल्याचा निष्कर्ष प्राचार्य डॉ. समीर बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.
दरवर्षी पावसाळा जवळ आला की, महाडमधील २५ हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या मनात सावित्रीच्या पुराची भीती निर्माण होते. पूरसमस्यांबाबत गेल्या दहा वर्षांच्या नोंदींचे संकलन करून बुटाला यांनी वरील महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर ठेवले आहेत.
महाड शहराला सावित्री, गांधारी व काळ अशा तीन नद्यांनी वेढलेले आहे. सावित्री नदी महाबळेश्वर येथे उगम पावते. तर काळ आणि गांधारी या दोन्ही नद्या रायगड जिल्ह्यात उगम पावतात. काळ नदी बिरवाडी येथे सावित्री नदीला येऊन मिळते आणि त्या ठिकाणाहून सावित्रीचे पात्र मोठे होऊ लागते. तर महाड शहराची हद्द संपल्यानंतर गांधारी नदी सावित्री नदीस येऊन मिळते.
महाडची नोंद इ.स.पूर्व २२५मध्ये कोकण किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर व व्यापारी केंद्र म्हणून नोंद आहे. सावित्री, गांधारी, काळ या तीन नद्या महाड परिसरात असून, बाणकोट ही जवळची खाडी आहे. याच खाडीतून बोटीद्वारे व्यापारी वाहतूक सतत चालत असे. इ.स.१६५६मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला ताब्यात घेतला आणि राजधानीचे बंदर म्हणून महाड महत्त्व प्राप्त झाले.
गेल्या ४० ते ५० वर्षांत सावित्री नदीपात्र गाळाने पूर्णपणे भरून गेले आणि त्यामुळे महाडमधील पूरसमस्येची निर्मिती झाल्याचे बुटाला यांनी सांगितले.
महाडमधील पूरसमस्येला आळा घालण्याकरिता सावित्री नदीतील गाळ काढणे, नदीला स्वरक्षण भिंत बांधणे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गांधारी व काळ या दोन्ही नद्यांना मिळणाऱ्या प्रवाहात बंधारे घालून पाणी अडवून साठवणे हे अत्यावश्यक आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे महाड शहरात २ ते ५ फुटांपर्यंत पाण्याची पातळी महाड शहराच्या रस्त्यांवर पावसाळ््यात पाहावयास मिळते. याच अतिरिक्त पाण्याचे नियोजन करणे शक्य आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर हे धरण महाड शहरापासून अवकाशीय अंतराने ३३ कि.मी. आहे. तर मुळशी धरणाचे अवकाशीय अंतर २३ कि.मी. आहे. जलसंधारणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार हे अतिरिक्त पाणी या दोन्ही धरणांत सोडणे अशक्य नाही. दुसरा पर्याय म्हणजे सावित्री नदीत टप्प्याटप्प्यांनी बंधारे बांधून पाणी अडवून ते धरणात सोडणे शक्य आहे.