- मयूर तांबडेपनवेल : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तालुक्यातील हालटेप, ताडाचा टेप या आदिवासी वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर काही गाव व वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी आली असून, तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.पनवेल तालुक्यातील कुंबलटेकडी, ताडपट्टी, हौशाची वाडी, चिंचवाडी, गारमाळ, येरमाळ, भेकरे आदी गाव-वाड्या पाणीटंचाईने त्रस्त आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत असून हजारो मीटर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागते. त्यातच नद्या आटल्यामुळे काही गावातील आदिवासींना पाण्यासाठी डोंगरावरून खाली उतरून यावे लागते.पाण्यासाठी आदिवासी महिलांना मुलाबाळांसह उन्हातान्हात भटकावे लागते. लोकसभा निवडणुकीमुळे प्रत्येक पक्ष शहरात तसेच काही गावांमध्ये फिरून आपापल्या उमेदवाराचा गाजावाजा करून प्रचार करत होते. मात्र, पाण्याची समस्या सोडविण्यात कोणीही स्वारस्य दाखविले नाही.पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून पाठविण्यात आलेला आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्यातील १७ गाव तर ३७ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.गारमाळ, बोंडरपाडा, सतीची वाडी, कुंबल टेकडी, चिंचवाडी, वाघाची वाडी, टावरवाडी आदी वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गारमाळ व बोंडरपाडा गावातील आदिवासींना तर तीन ते साडेतीन किलोमीटर पायी चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे. तर काही आदिवासी बांधवांना फार्महाउस मालक पाणी देत आहेत. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला आहे, तर गावातील बोअरवेलचे पाणी कमी झाले असल्याचे नागरिक सांगत आहेत.पनवेल तालुक्यातील देहरंग (गाढेश्वर) धरणातून पनवेल तसेच नवीन पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, याच परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना रणरणत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.वारदोली ग्रामपंचायत हद्दीतील हालटेप व ताडाचाटेप या दोन वाड्यांवर २३ एप्रिलपासून दिवसाआड शासकीय टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर आपटा ग्रामपंचायत येथील घेरावाडी, माड भवन, कोरळ वाडी येथे टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणीही टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर. डी. चव्हाण यांनी दिली.तर शिरवली, कोंडप, मोहोदर, कुत्तर पाडा या चार वाड्यांची पाहणी केलेली असून या ठिकाणी टँकरची मागणी करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीकडून तसा ठराव आला की त्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. २०१९ मध्ये कानपोली, गुळसुंदे, सावळे, कसळखंड, नारपोली, धोदानी, मालडुंगे, नेरे, वाकडी ही नऊ गावे व गराडा, नेरेपाडा, कोरलवाडी या तीन वाड्यांतील विंधण विहिरींची विशेष दुरुस्ती करण्यात आली. यासाठी अंदाजे तीन लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत.तालुक्यातील अनेक ठिकाणच्या बोअरवेल व विहिरी बंद अवस्थेत आहेत, त्यांची दुरुस्ती केल्यास त्याचा वापर करता येणे शक्य असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.ज्या गावासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी बिडिओकडे ठराव येईल, त्याची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याची टंचाई आहे की नाही, याबाबतचा प्रस्ताव तयार करून प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठविणार आहोत.- आर. डी. चव्हाण, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती
आदिवासी वाड्यांवर जलदुर्भिक्ष, पनवेलमधील १७ गावे, ३७ वाड्या टंचाईग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 1:57 AM