नवी मुंबई शहरवासीयांवर पाणीकपातीचे संकट, महापालिकेचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 02:27 AM2019-06-24T02:27:41+5:302019-06-24T02:29:14+5:30
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात जून महिन्यात गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी असमाधानकारक कमी पाऊस झाला आहे.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई - नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात जून महिन्यात गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी असमाधानकारक कमी पाऊस झाला आहे. कमी झालेल्या पावसामुळे शहरावर पाणीसंकट ओढवू नये यासाठी पाणीकपात करण्याचे संकेत महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
नवी मुंबई शहरात मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिन्यात विजांच्या कडकडाटात सुरु वात झालेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाची पाणीसाठा करण्याची क्षमता १९0.८९ दशलक्ष घनमीटर असून, दररोज ३८0 ते ३९0 एमएलडी पाणीसाठ्याची शहराला गरज आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात पूर्णपणे भरलेल्या मोरबे धरणात ५८.६७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक असून, शिल्लक पाणीसाठा शहराला सुमारे १0 सप्टेंबरपर्यंत पुरणार आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात मोरबे धरण क्षेत्रात ८८0 मिलीलिटर इतका पाऊस झाला होता. यावर्षी जून महिन्यातील अवघे काही दिवस शिल्लक असून जून महिन्यात आतापर्यंत केवळ ६२ मिलीलीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात अपेक्षित पाणीसाठा जमा न झाल्याने शहरात पाणीकपातीचे महापालिकेने संकेत दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.
नासाडी थांबविण्यासाठी पथकाची नेमणूक
नवी मुंबई शहरात पाण्याचे संकट येऊ नये यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कंत्राटदारांमार्फत पथक नेमण्यात येणार असून पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
मोरबे धरण क्षेत्रात मागील वर्षी जून महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सरासरीमध्ये धरणाची पातळी सुमारे चार मीटरपेक्षा कमी असून पावसाची परिस्थिती पाहून या आठवड्यात काही प्रमाणात पाणीकपात करण्याबाबत निर्णय घेणार आहोत.
- डॉ.रामास्वामी एन.,
महापालिका आयुक्त