पनवेलकरांवर पाणी दरवाढीचे संकट, सिडकोने वाढविले दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 03:24 AM2020-03-21T03:24:36+5:302020-03-21T03:25:21+5:30
पनवेल तालुक्यामधील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे व द्रोणागिरी नोडला सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.
नवी मुंबई : पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या पनवेलकरांवर आता पाणी दरवाढीचे संकट कोसळले आहे. सिडकोने फेब्रुवारी-मार्चच्या देयकापासून सुधारित दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वापरासाठीच्या दरामध्येही वाढ केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पनवेल तालुक्यामधील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे व द्रोणागिरी नोडला सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. शेजारील नवी मुंबई महानगरपालिकेमधील रहिवाशांना २४ तास पाणीपुरवठा होत असताना पनवेल परिसरामध्ये मात्र पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. मार्चमध्येच तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांना आवश्यक तेवढेही पाणी दिले जात नाही. यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाने पाणी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको प्रशासनाने सिडकोच्या व्यापारी, सामाजिक व धर्मादाय संस्था तसेच निवासी वापराच्या नळ जोडण्यांकरिता व सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांकरिता फेब्रुवारी-मार्चच्या देयकापासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारीत पाणी दरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सर्वप्रथम पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
यापूर्वी व्यापारी वापरासाठी प्रतिघनमीटर ३५ रुपये दर आकारला जात होता. त्यामध्ये वाढ करून ४५ रुपये करण्यात आले आहेत. सामाजिक संस्थांचे दर १४ वरून १८ करण्यात आले आहेत. घरगुती वापराच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. २० घनमीटरपर्यंत पाणी वापरल्यास पूर्वीच्या ४.७५ रुपयांऐवजी ६ रुपये दर आकारण्यात येणार आहे. ४२ घनमीटरच्या वर पाणी वापरल्यास पूर्वी ७ रुपये दर होता तो २० रुपये करण्यात आला आहे.