तळोजा एमआयडीसीमध्ये पाणीकपात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:27 PM2019-09-26T23:27:22+5:302019-09-26T23:28:11+5:30
कामकाजावर परिणाम; आंदोलनाचा इशारा
पनवेल : तळोजा एमआयडीसीमध्ये पाणीकपात सुरू झाली आहे. यामुळे कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना एमआयडीसीमध्ये गरजेपुरतेही पाणी मिळत नसल्याने उद्योजकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून टीएमए संघटनेने ३० सप्टेंबरला मोर्चाचे आयोजन केले आहे.
पाणीकपातीमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती अशीच सुरू राहिली तर तळोजा एमआयडीसीमधील अनेक कारखाने बंद पडतील, अशी शक्यता टीएमएचे अध्यक्ष शेखर श्रीगारे यांनी व्यक्त केली आहे. तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाचा विषय हरित लवादामध्ये दाखल झाल्यांनतर कारखानदारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २५ टक्के पाणीकपात केली आहे. त्यामध्ये एमआयडीसीने ५० टक्के भर टाकल्याने एकूण ७५ टक्के पाणीकपातीत कारखाने चालवणार कसे? असा प्रश्न कारखानदार उपस्थित करीत आहेत.
पाणीकपातीविरोधात शांततेत मोर्चा काढून एमआयडीसी प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. टीएमए या कारखानदारांच्या संघटनेत एकूण ४३९ कारखानदारांचा समावेश आहे. या कंपन्यांचे कारखानदार या मोर्चात सहभागी होणार आहेत. पाणीकपात थांबवा, अशी विनंती कारखानदार एमआयडीसीला करीत आहेत.