नवी मुंबई : महापालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या वाशीतील जेएन-२ टाइपच्या गुलमोहर सोसायटीतील इमारतींची वीज आणि नळजोडण्या शुक्रवारी खंडित करण्यात आल्या. या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलीसबळाचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेने अचानक ही कारवाई केल्याचा आरोप करीत रहिवाशांनी या मोहिमेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलीसबळाचा वापर करीत इमारतींचा पाणीपुरवठा व वीजजोडण्या खंडित केल्याने संतप्त रहिवाशांनी थेट महापौर जयवंत सुतार यांना साकडे घातले.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून प्रत्येक वर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. पावसामध्ये इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जाते. गेल्या वर्षी ३६७ बांधकामे धोकादायक घोषित करण्यात आली होती. या वर्षी ७६ ची वाढ झाली आहे. यात ५५ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. वाशी येथील जेएन-२ टाइपच्या गुलमोहर सोसायटीतील २१ पैकी ११ इमारतींचा यात समावेश आहे. महापालिकेने या इमारतींना नोटिसा बजावून त्याचा वापर बंद करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. त्यानंतरसुद्धा वापर सुरूच रहिल्याने शुक्रवारी दुपारी महापालिकेच्या पथकाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात या इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने इमारतीतील रहिवाशांत एकच खळबळ उडाली. कोणतीही पूर्वसूचना न देता विशेषत: घरातील सर्व पुरुष मंडळी नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर असताना ही कारवाई केल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला. महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी विरोध करणाºया महिला व ज्येष्ठ नागरिकांना अक्षरश: ओढून काढत पाणी व वीजपुरवठा खंडित केला. या प्रकाराने भयभीत झालेल्या रहिवाशांनी थेट महापौर जयवंत सुतार यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली. शहरात अनेक अतिधोकादायक इमारती असताना केवळ याच इमारतीवर कारवाई का, असा सवाल रहिवाशांनी या वेळी उपस्थित केला. यासंदर्भात चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल. तसेच गुलमोहर सोसायटीतील इमारतीचा वीज व पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले. असे असले तरी रात्री उशिरापर्यंत या इमारतीचा वीज व पाणीपुरवठा सुरू झाला नव्हता, त्यामुळे रहिवाशांनी थेट महावितरणच्या कार्यालयावर रात्री हल्लाबोल केला. तसेच महापालिकेचे विभागा अधिकाºयाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा महापौर जयवंत सुतार यांनी येथील रहिवाशांची भेट घेऊन चर्चा केली.गुलमोहर सोसायटीतील सात इमारतींचा चुकीच्या पद्धतीने अतिधोकादायक यादीत समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच आवश्यक दुरुस्ती करून स्वत:च्या जबाबदारीवर या इमारतीत राहण्याबाबत महापालिकेला प्रतिज्ञापत्रही दिले होते. त्यानंतरही शुक्रवारी कारवाई झाल्याने रहिवाशांनी स्थानिक नगरसेवकावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. दरम्यान, महापालिकेने अगोदर येथील रहिवाशांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे रात्री उशिरा विद्युत व पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.गुलमोहर सोसायटीच्या इमारतीतील पाणीपुरवठा व वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. तेथील रहिवाशांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कारवाई करू नये. मागील १५ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका व सिडकोने यात आग्रही भूमिका घेण्याची गरज आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूरपोलिसांनी महिला व ज्येष्ठ नागरिकांना धक्काबुकी केली. हा प्रकार अत्यंत क्लेषदायक होता. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्तांनी कारवाईबाबत रहिवाशांना अभय दिले होते. तसेच यासंदर्भात सोसायटीने न्यायालयातही दावा केला आहे. त्यानंतरसुद्धा ही कारवाई करण्यात आली.- चंद्रकांत अनंत हरयाण, ज्येष्ठ नागरिकवीज व पाणीपुरवठा खंडित केलेल्या इमारती धोकादायक नाहीत. केवळ विकासकाच्या फायद्यासाठी त्या अतिधोकायदाक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. महापालिकेने पोलीसबळाचा वापर करून शुक्रवारी केलेली कारवाई निंदनीय आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांना जबरदस्तीने घराबाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईचा येथील रहिवाशांनी धसका घेतला आहे.- सुदत्त दिवे, सदस्य, क प्रभाग समिती, महापालिका
धोकादायक इमारतींचे पाणी, वीज खंडित; वाशीत महापालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:41 AM