- नामदेव मोरे, नवी मुंबई स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे नवी मुंबईमध्ये पाण्याची प्रचंड उधळपट्टी सुरू आहे. १९ टक्के पाणीगळती सुरू आहे. गळती व ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाणी यामुळे उत्पन्न व खर्चामध्ये मोठी तफावत येवू लागली आहे. पाणी बिलाची थकबाकीही ३३ कोटी ७४ लाख रुपयांवर गेली आहे. नवी मुंबईमधील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करता यावा यासाठी महापालिकेने मोरबे धरण विकत घेतले आहे. मालकीचे धरण असल्यामुळे शहरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. परंतु उपलब्ध पाण्याचा योग्य वापर महापालिका करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी लक्षवेधी मांडून या प्रश्नावर शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. शासनाकडेही पाठपुरावा केला आहे. शहरात तब्बल १९ टक्के पाणी गळती होत आहे. पिण्याचे पाणी उद्यान व इतर कारणांसाठी वापरले जात आहे.विहिरी, तलाव व मलनिस्सारण केंद्रामधील पाण्याचाही वापर केला जात नाही. २००५ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी २० वर्षे पाणी बिल न वाढविण्याचे आश्वासन दिले. २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर ५० रुपयांमध्ये ३० हजार लिटर पाण्याची घोषणा करण्यात आली. देशात सर्वात स्वस्त दरात पाणी देणारी महापालिका असा नावलौकिक मिळविण्यात आला. पाणी मुबलक असल्यामुळे चोवीस तास पाण्याचे वितरण सुरू करण्यात आले. सवंग लोकप्रियतेसाठी करण्यात आलेल्या घोषणा व धोरणांमुळे महापालिकेच्या तिजोरीवरील ताण वाढत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणी वितरणासाठी करण्यात येणारा खर्च पाणी बिलामधून वसूल झाला पाहिजे असा दंडक केंद्र शासनाचा आहे. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी २०१० - ११ मध्ये १२७ कोटी ८१लाख रुपये खर्च झाला होता. पाणी बिलामधून ६५ कोटी ३० लाख रुपयेच वसूल झाले होते. २०१४ - १५ मध्ये ११५ कोटी ३९ लाख रुपये खर्च झाले होते. परंतु पाणी बिलामधून ८६ कोटी ७७ लाख रुपये वसूल झाले. पाच वर्षामध्ये तब्बल ५५१ कोटी ७ लाख रुपये खर्च झाला असून फक्त ३७० कोटी २७ लाख रुपये वसूल झाले आहेत. सिडकोकडील ५ कोटी ४५ लाख, गावठाणात ७ कोटी १७ लाख, सामान्य भागात १० कोटी ५ लाख, वाणिज्य व सार्वजनिक परिसरात ७ कोटी १९ लाख रुपये असे ३५ कोटी २४ लाख रुपये थकबाकी होती. थकबाकी वसुलीची मोहीम सुरू केली असली तरी अद्याप ३३ कोटी ७४ लाख रुपये वसूल झालेले नाहीत. पालिकेने आतापर्यंत ४२२८ थकबाकीदारांना नोटीस दिल्या आहेत. पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणाशहरातील साडेबारा लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी ५६ जलउदंचन केंद्रे आहेत. एबीआर व भूमिगत व उच्चस्तरीय असे एकूण ११४ जलकुंभ आहेत. मनपा क्षेत्रात १०८ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी असून ९७२ किलोमीटरचे अंतर्गत जाळे आहे. उधळपट्टी थांबविण्यासाठी पाठपुरावाकाँगे्रस नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी शहरातील पाण्याची उधळपट्टी व दुरुपयोगावर शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. महापालिकेमध्ये लक्षवेधी मांडली असून शासनाकडे पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. नवी मुंबईकरांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी पाण्याचा दुरुपयोग थांबविला पाहिजे. पाण्याची उधळपट्टी व गळती थांबविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाण्याचा जमा - खर्च जुळेना
By admin | Published: August 25, 2015 12:54 AM