- नामदेव मोरेनवी मुंबई : तुर्भे रेल्वे यार्डातील धान्य व सिमेंटच्या साठ्यावर जलवर्षाव होऊ लागला आहे. छतातून होणारी गळती थांबविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्लॅटफॉर्मची प्रचंड दुरवस्था झाली असून, स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.मुंबई व उपनगरांमधील प्रमुख रेल्वे धक्क्यांमध्ये तुर्भेचा समावेश होत आहे. याठिकाणी देशाच्या विविध भागातून तांदूळ, गहू व सिमेंट मुंबईमध्ये येत असते. प्रत्येक महिन्याला २० ते २५ वॅगनमधून साहित्य याठिकाणी आणले जाते. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील कोट्यवधी रुपयांच्या साहित्याचे नुकसान होऊ लागले आहे. रेल्वेतून येणारा माल प्लॅटफॉर्मवर ठेवला जात आहे. अनेक ठिकाणी छताची दुरवस्था झाली आहे. पत्रे तुटले असून पावसाचे पाणी सिमेंट व धान्यावर पडू लागले आहे. नुकसान होऊ नये यासाठी साहित्यावर ताडपत्री टाकावी लागत आहे. ताडपत्री उडून नुकसान होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये या समस्येला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडे मागणी करूनही छताची दुरुस्ती करण्याकडे लक्ष दिले जात नाही. मुसळधार पाऊस सुरू असताना नुकसान टाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्लॅटफॉर्मचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी धक्का तुटलेला आहे. ट्रक व कंटेनर धक्क्याला व्यवस्थित लावता येत नाही. यामुळे माथाडी कामगारांना त्रास होत आहे.तुर्भे रेल्वे यार्डातील रुळावरील कचराही उचलला जात नाही. पूर्ण यार्डात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घाण व साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कचरा साफ करण्यासाठी ठोस यंत्रणाच उपलब्ध नाही.रेल्वे यार्डामध्ये अर्धा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला आहे. उर्वरित अर्ध्या भागामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. याठिकाणी अवजड वाहनांचा वावर असून अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक खचू लागले आहेत. याठिकाणी शेकडो कामगार काम करत आहेत. कामगारांसाठीही फारशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.२५ जुलैला बैठकमहाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने तुर्भे व मुंबई परिसरातील सर्व रेल्वे धक्क्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. गैरसोयीचा सर्वाधिक फटका माथाडी कामगारांना बसू लागला असून व्यवसायावरही परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्या सोडविण्यासाठी २५ जुलैला विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला माथाडी व इतर संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी २० जुलैला रेल्वेच्या अधिकाºयांची बैठक होणार असून त्यामध्ये सर्व समस्या सोडविण्यासाठीचे नियोजन केले जाणार आहे. यामुळे आता कामगारांसह व्यावसायिकांचे लक्ष २० व २५ जुलैला होणाºया बैठकीकडे लागले आहे.तुर्भे रेल्वे धक्क्यावर छतामधून पाणी गळत आहे. सिमेंट व धान्य भिजू नये यासाठी ताडपत्रीचा वापर केला जात आहे. धक्क्याची दुरवस्था झाली असून त्याचा त्रास माथाडी कामगारांना होत आहे. स्वच्छतेकडेही दुर्लक्ष केले जात आहे.- बाबाजी चौधरी,माथाडी कामगार
धान्यासह सिमेंटवर जलवर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:20 AM