नामदेव मोरेनवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील ध्वनिप्रदूषण चिंतेचा विषय बनला आहे. शांतता क्षेत्रासह निवासी विभागामध्येही गोंगाट निकषापेक्षा जास्त वाढला आहे. खाडीमधील क्लोराईडचे प्रमाण निकषापेक्षा ५ ते १० पट जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.नवी मुंबई महापालिकेने २०१८ - १९ वर्षासाठीचा पर्यावरणविषयक अहवाल तयार केला आहे. पाच वर्षापूर्वी शहरातील हवा, ध्वनी व खाडी, तलावांमधील पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण गंभीर होते. महापालिकेने हवा प्रदूषण कमी करण्यासाठी हरित पट्ट्यांचे प्रमाण वाढविले आहे. एमआयडीसीमधील दगडखाणीही बंद झाल्या आहेत. यामुळे हवेची गुणवत्ता सुधारू लागली आहे. परंतु अद्याप हवेतील धूलिकणांचे प्रमाण काही ठिकाणी निकषापेक्षा जास्त आहे. एसपीएमचे प्रमाण प्रत्येक नोडपेक्षा जास्तच असल्याचे निदर्शनास आले आहे. ध्वनिप्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. निवासी क्षेत्रांमध्ये सरासरी ५५ डेसिबल एवढे प्रमाण असणे आवश्यक आहे. परंतु प्रत्येक नोडमध्ये यापेक्षा जास्त प्रमाण आहे.नेरूळमध्ये ६० डेसिबलपर्यंत प्रमाण गेले आहे. महापे पुलावर सरासरी ६७ डेसिबल आवाजाची पातळी आहे. शहरातील ३२ ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये रुग्णालय व शाळांचा समावेश आहे. शांतता क्षेत्रात सरासरी ५० डेसिबल ध्वनी पातळी असणे आवश्यक आहे. परंतु नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ परिसरात हे प्रमाण ६१ डेसिबलपर्यंत गेले आहे. शहरातील वाहनांची वाढती संख्या व हॉर्नचा अनावश्यक वापर यामुळे ध्वनिप्रदूषण वाढत आहे.नवी मुंबईकरांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे. महापालिकेने सांडपाण्यावरही प्रक्रिया करण्यास सुरवात केली असून विहिरी व तलावांमधील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. परंतु खाडीमधील प्रदूषण थांबविण्यात अद्याप यश आलेले नाही. खाडीमध्ये मुंबई व ठाणे परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सांडपाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाते. कारखान्यांमधील पाणीही खाडीत सोडले जात आहे. खाडीच्या पाण्यामध्ये क्लोराईडची मात्रा प्रमाणापेक्षा जास्त होवू लागली आहे. सानपाडा येथे क्लोराईडचे प्रमाण ११ पट जास्त होते. वाशी पुलाजवळ हेच प्रमाण पाच पट जास्त होते. खाडीमधील प्रदूषणाचा परिणाम जैवविविधतेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.धूलिकणांचे प्रमाण जास्तचमहापालिकेने विकसित केलेले हरित पट्टे व बंद पडलेल्या दगडखाणी यामुळे हवा प्रदूषण काही प्रमाणात कमी झाले आहे. सल्फरडाय आॅक्साईड व आॅक्साईड्स आॅफ नायट्रोजन यांचे प्रमाण नियंत्रणात आले आहे. धूलिकणांचे प्रमाणही गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी झाले असले तरी शासनाच्या वार्षिक मानकापेक्षा ते जास्तच असल्याचे निदर्शनास आले आहे. कोपरखैरणे, ऐरोली व तुर्भेमधील केंद्रांवर एसपीएमची मात्रा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.शहरातील शांतता क्षेत्र पुढीलप्रमाणे.....महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल सीबीडी, ज्ञानपुष्प विद्यामंदिर सीबीडी सेक्टर ४, एमईएस स्कूल सेक्टर २० सीबीडी, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल सेक्टर ५ नेरूळ, एसबीओए स्कूल सेक्टर ५ नेरूळ, सेंट आॅगस्टीन हायस्कूल सेक्टर १५ नेरूळ, एपीजे स्कूल सेक्टर १५ नेरूळ, शुश्रूषा हॉस्पिटल सेक्टर ६ नेरूळ, एमजीएम स्कूल सेक्टर ८ नेरूळ, विद्याभवन स्कूल सेक्टर १८ नेरूळ, डीएव्ही स्कूल सेक्टर २४ नेरूळ, डीपीएस स्कूल सेक्टर ५२ नेरूळ, न्यू बॉम्बे हायस्कूल सेक्टर ३ वाशी, एमजीएम हॉस्पिटल सेक्टर ४ वाशी, स्टर्लिंग हॉस्पिटल सेक्टर ७ वाशी, सेंट लॉरेंस हायस्कूल सेक्टर ९ ए , अंजूमान हायस्कूल सेक्टर ९ ए वाशी, साईनाथ हायस्कूल सेक्टर ९ ए वाशी, महानगरपालिका रुग्णालय वाशी, पीकेसी हॉस्पिटल सेक्टर १४ वाशी, अॅवलॉन हायस्कूल व इंटरनॅशनल स्कूल वाशी, अंजूमन उर्दू हायस्कूल सेक्टर २१, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संकुल सानपाडा, टिळक कॉलेज सेक्टर ४ कोपरखैरणे, रा. फ. नाईक स्कूल कोपरखैरणे, इंदिरा गांधी कॉलेज सेक्टर १६ कोपरखैरणे, ज्ञानविकास मंदिर विद्यालय सेक्टर २२, ज्ञानदीप संकुल सेक्टर २ ऐरोली, श्रीराम विद्यालय सेक्टर ३ ऐरोली, सेंट झेव्हिअर्स स्कूल सेक्टर ६ ऐरोली, राधिकाबाई मेघे विद्यालय ऐरोली, सानपाडा कॉलेज आॅफ कॉमर्स
नवी मुंबईत जल, ध्वनिप्रदूषण चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 2:06 AM