वैभव गायकर ।पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात भीषण पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवसांनी होऊ लागला आहे. त्यामुळे पनवेलकरांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांत कमालीचा संताप असून, याचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निर्माण झालेल्या ‘पाणी’बाणीला महापालिका प्रशासनाचा बेफिकीर कारभार जबाबदार असल्याचा आरोप पनवेलकरांकडून होत आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको, एमजेपी आणि एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या आप्पासाहेब वेदक धरणाचा पाणीसाठा संपुष्टात आल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पनवेल शहराला दिवसाला २८ ते ३० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात केवळ १७ एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, हे पाणीसुद्धा दिवसाआड देण्याचे धोरण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात दोन-दोन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत, त्यामुळे अनेक भागातील रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. टँकरच्या पाण्याला मागणी वाढल्याने शहरात टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. रोहिदास वाडा, भुसार मोहल्ला, पटेल मोहल्ला, प्रभूआळी, परदेशीआळी, अशोका गार्डन, लोखंडीपाडा, सावरकर चौक आदी ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याचे वेळापत्रक कोलमडल्याने कोणत्या वेळी पाणी येईल, याचा नेम नाही. त्यामुळे रहिवाशांना २४ तास नळाकडे डोळे लावून बसावे लागत आहे. या समस्येवर महापालिका प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत, त्यामुळे शहरवासीयांना कायमस्वरूपी या पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.पनवेल पालिका हद्दीतील ग्रामीण भागालाही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागाला दिवसाला २० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना, प्रत्यक्षात केवळ १० एमएलडी इतकेच पाणी दिले जात आहे. सिडको कार्यक्षेत्रातील वसाहतींनाही पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रात या पाणीसमस्येवरून येत्या काळात उद्रेक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत. नागरिकांच्या दूरध्वनीला प्रतिसाद दिला जात नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांविषयी जनतेत रोष निर्माण झाला आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रत्येक आठवड्याला सोमवार आणि मंगळवारी शटडाउन घेतला जातो. त्यामुळे मागील दोन दिवस पाण्याची समस्या निर्माण झाली. तसेच एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठाही सलग नसल्याने या समस्येत भर पडली आहे. नवी मुंबई महापालिकेमार्फत दिला जाणारा पाणी भरण्याचा पॉइंट केवळ दोन इंच व्यासाचा आहे. त्यामुळे एक टँकर भरायला अर्धा ते एक तास लागत आहे. याचा परिणाम म्हणून दिवसभरात ५० टँकर भरणे शक्य होत नाही.- रामदास तायडे,पाणीपुरवठा अधिकारी,पनवेल महापालिकागाळ काढण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी रॉयल्टी माफ करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. यावर लवकरच निर्णय येणे अपेक्षित आहे. त्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला वेग प्राप्त होईल, तसेच पनवेल शहरातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर व आयुक्तांची लवकरच भेट घेणार आहोत.- नीलेश बाविस्कर,सभापती, पाणीपुरवठा मलनि:सारण समितीपनवेल शहरात अशा प्रकारची भीषण समस्या कधीच उद्भवली नव्हती. सत्ताधाºयांच्या मार्फत याबाबतही राजकारण केले जात आहे. प्रशासनावर दबाव आणून टँकर आपल्या प्रभागात वळविण्याचे काम सध्या सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे पनवेलवासीयांवर पाण्याचे संकट ओढावले आहे.- डॉ. सुरेखा मोहोकर,नगरसेविका,पनवेलटँकर लॉबीपनवेल शहरातील नागरिकांना नाईलाजास्तव टँकरने पाणी मागवावे लागत आहे. ही बाब टँकरमाफियांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे एका टँकरसाठी १५०० ते २५०० रुपयांची आकारणी केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.५० टँकर पाण्याचे नियोजन नाहीपनवेलला नवी मुंबईत महापालिकेने दररोज ५० टँकर पाणी द्यायला सुरुवात केली आहे; परंतु पनवेल महापालिकेकडून या टँकरचे योग्य नियोजन होत नसल्याने पाणी असूनही त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. यातच पनवेल महापालिकेकडे पुरेसे टँकर नाहीत. त्यामुळे दरदिवशी ५० टँकर पाणी घेण्यास पनवेल महापालिका अपयशी ठरताना दिसत आहे.विहिरी पुनर्जीवित करण्याची गरजशहरात जवळपास २६ विहिरी आहेत. यापैकी अनेक विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या विहिरींची निगा राखल्यास त्या पाण्याचा उपयोग विविध कामांसाठी करता येईल.
पनवेल तालुक्यात ‘पाणी’बाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:56 AM