पावसामुळे दिवाळीच्या खरेदीवर पाणी; विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 02:48 AM2017-10-15T02:48:50+5:302017-10-15T02:48:58+5:30
आॅक्टोबर हिटने प्रचंड हैराण झालेल्या मुंबईकरांना शनिवारी दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने सुखद गारवा दिला.
नवी मुंबई : आॅक्टोबर हिटने प्रचंड हैराण झालेल्या मुंबईकरांना शनिवारी दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने सुखद गारवा दिला. हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला असून, भरदुपारी अचानक काळोख झाला आणि मुसळधार पावसाला सुरु वात झाली. सकाळपासून पावसाची कसलीच चाहूल न लागताच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना अडोसा शोधून रक्षण करावे लागले तर बाइकस्वारांनाही वाहन थांबवून अडोशाचा शोध घ्यावा लागला. दिवाळी फराळ, तसेच सजावटीचे साहित्य खरेदीकरिता नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातून तुर्भेत मॅफ्को मार्केट येथे खरेदीसाठी येणा-या ग्राहकांचा हिरमोड झाला.
अचानक आलेल्या पावसामुळे ग्राहकांची तारांबळ उडाल्याने खरेदीचा उत्साह कमी झाल्याचा असंतोष व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात आला. यंदा दिवाळी तरी साजरी करता येणार की नाही, अशी धास्ती नागरिकांमध्ये आहे. दुपारपासून जोर धरलेल्या या पावसाने कार्यालयातून काम उरकून बाहेर पडणाºया नोकरदारवर्गापुढे प्रश्नचिन्ह उभे केले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या जोरदार पावसाने अनेक परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. सप्टेंबरच्या अखेरपासून उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना मात्र या पावसामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने दिलासा दिला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार या पावसाने कोणत्याही प्रकारचे नुकसान न झाल्याची माहिती दिली. सोसाट्याच्या वाºयासह झालेल्या या पावसामुळे झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. सखल भागात भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्ग काढणे मुश्कील झाले.
बाजारपेठेला पावसाचा फटका
सर्वत्र दिवाळीच्या बाजारपेठा सजल्या असून, अचानक येणाºया पावसाच्या सरींमुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. रांगोळी, दिवे, आकाशकंदील तसेच कपड्यांच्या विक्रेत्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला असून, खरेदीही मंदावली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीकरिता नोकरदारवर्गासाठी असलेला अखेरच्या वीकेण्डवरही पावसाने पाणी फेरले. त्यामुळे बाजारपेठा रिकाम्या झाल्याने व्यापारी वर्ग, विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिवाळीनिमित्त कपड्यांच्या खरेदीवरही पावसाचा परिणाम झाल्याचे दिसून आले.
बाजारपेठा झाल्या रिकाम्या
कडकडाटासह पाऊस झाल्याने अनेकांनी घरातून बाहेर न पडणे पसंत केले. कापड बाजारात फारशी गर्दी आढळून आली नाही. शहरातील सराफी पेढ्यासुद्धा थंड दिसून आल्या. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानातही फारसे ग्राहक दिसले नाहीत.
वातावरणात बदल
गेल्या तीन-चार दिवसांपासून दुपारी असह्य उकाडा आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाच्या सरींमुळे वातावरणात बदल झाला आहे. या वातावरणामुळे रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, दुपारी तापमानाचा वाढत आहे. आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेलापूर विभागात १९.३ मि.मी., नेरुळ विभागात २६.४ मि.मी., वाशीत ९.६ मि.मी. आणि ऐरोलीत ९.६ मि.मी. अशा सरासरी १६.२० मि.मी. पावसाची नोंद झाली.
शेतमालाचे नुकसान
परतीच्या पावसामुळे एपीएमसी परिसरातील भाजीपाला, फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आठवडी बाजारात शेतमालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकºयांनाही या पावसामुळे तोटा झाला. सप्टेंबर सरल्याने शेतकºयांच्या दृष्टीने हा अवकाळी पाऊसच समजला जात आहे.