तळोजा एमआयडीसीला पुनर्प्रक्रिया केलेले पाणी; सिडकोचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:57 AM2020-12-02T00:57:02+5:302020-12-02T00:57:10+5:30
कळंबोली आणि कामोठे येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून अदांजे ४५ द.ल.लीटर सांडपाण्यावर कळंबोली येथील नियोजित पुनर्प्रक्रिया प्रकल्पात गोळा केले जाणार आहे.
नवी मुंबई : पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी तळोजा क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्राला पुरविण्याचे नियोजन सिडको करीत आहे. त्यासाठी कळंबोली येथे मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पात पुनर्प्रक्रिया केलेले ३0 द.श.लीटर पाणी तळोजा एमआयडीसीतील उद्योगांना पुनर्वापरासाठी पुरविण्याचा सिडकोचा विचार आहे.
कळंबोली येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रात ५0 दशल लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. सध्या येथे २0 ते २५ द.ल. लीटर पाणी गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते, तसेच कामोठे येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रात दररोज २0 ते २५ द.ल. लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.
कळंबोली आणि कामोठे येथील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातून अदांजे ४५ द.ल.लीटर सांडपाण्यावर कळंबोली येथील नियोजित पुनर्प्रक्रिया प्रकल्पात गोळा केले जाणार आहे. या पाण्यावर या प्रकल्पात पुनर्प्रक्रिया करून साधारण ३0 द.ल.लीटर पाणी पुनर्वापरासाठी तळोजा एमआयडीसीला पुरविण्यात येणार आहे. सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राच्या उभारणीसाठी सिडकोने तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. याद्वारे प्रकल्पाच्या उभारणीला येणारा खर्च व इतर आवश्यक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. २0२१ पर्यंत बांधून पूर्ण करण्याचा निर्धार आहे.
कळंबोलीत सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्राचा प्रस्ताव
जगभरात पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापरावर भर दिला जात आहे. सिडकोनेही सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कळंबोली येथे मलनिस्सारण पुनर्प्रक्रिया केंद्र प्रस्तावित केले आहे. पाण्याची बचत आणि पर्यावरणाचे रक्षण यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण असल्याचे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी व्यक्त केले.