- नामदेव मोरेनवी मुंबई : सुधागड तालुक्यामधील मृगगडाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवप्रेमी तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले आहेत. गडावर जाण्यासाठी माहिती फलक बसविण्यात आले आहेत. श्रमदान करून पाण्याच्या टाक्यांमधील गाळ काढण्याचे कामही सुरू केले असून पावसाळ्यापूर्वी सर्व जलसाठे गाळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.गड - किल्ले हेच महाराष्ट्राचे खरे ऐतिहासिक वैभव. ही संपत्ती जपण्यासाठी पूर्णत: शासनावर अवलंबून न राहता शिवप्रेमी तरुणांनी व संस्थांनी अनेक किल्ल्यांवर स्वत:च संवर्धनाचे काम सुरू केले आहे. दुर्लक्षित गड किल्ल्यांवर मोहिमांचे आयोजन करून तेथील इतिहास जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. राज्यातील काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या किल्ल्यांमध्ये सुधागड तालुक्यामधील मृगगडाचाही समावेश होतो. आंबेनळी घाटाला लागून असलेल्या डोंगररांगांमध्ये टेहळणीसाठी याची उभारणी करण्यात आली. खोपोली-पाली रोडवरून आतमध्ये भेलीव गावच्या मागील बाजूला हा किल्ला असून भेलीवचा किल्ला असेही त्याला संबोधले जाते. गडाच्या काळ्या खडकामध्ये गुहा पाहण्यासारखी आहे. गडावर खडक फोडून पाण्याच्या टाक्या तयार केल्या आहेत. वाड्याचे अवशेषही पहावयास मिळत आहे. गडावर शिवलिंग व इतर मूर्तीही असून मंदिराच्या बाहेर दीपमाळ आहे. भेलीव गावातील जंगलातून वाट काढून व दोन्ही खडकांच्या मध्ये असलेल्या अरुंद वाटेने गडावर जावे लागते. खडक फोडून पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत.मृगगडावर दुर्गवीर संस्थेच्यावतीने श्रमदानातून संवर्धनाचे काम सुरू आहे. संस्थेचे प्रमुख संतोष हसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी गडाला भेट देत आहेत. गडावर जाणाºया मार्गावर सूचना फलक लावण्यात आले आहेत. वाड्याचे अवशेष व मंदिर परिसराची साफसफाई केली जात आहे. सद्यस्थितीमध्ये गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. काही टाके मातीने पूर्णपणे भरून गेले आहेत. यामुळे या टाक्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.१० फेब्रुवारीलाही दहा तरुणांनी श्रमदान मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. दिवसभर टाक्यातील गाळ काढण्यात आला. पावसाळ्यापूर्वी सर्व जलसाठ्यांमधील गाळ काढण्यात येणार असल्याची माहिती या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेल्या अल्पेश पाटील त्यांनी दिली. जलसाठे गाळमुक्त झाल्यामुळे त्याचा लाभ गडावर येणाºया पर्यटकांना व आजूबाजूच्या जंगलातील प्राणी व पक्ष्यांनाही होणार आहे.मोहिमेमधीलसहभाग वाढतोयमृगगड संवर्धनासाठी रविवारी आयोजित केलेल्या श्रमदान मोहिमेमध्ये अल्पेश पाटील, प्रकाश फ्राकते, भूषण नाडकर्णी, विशाल इंगळे, एकनाथ अस्वले, रितेश कडू, आकाश धावडे, महेंद्र बाबर, प्रदीप माडके, किशोर सांगळे यांनी सहभाग घेतला होता. गडाचा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी आयोजित केलेल्या या मोहिमांमध्ये श्रमदान करणाºयांची संख्या वाढू लागली आहे.
मृगगडावरील जलसाठे पावसाळ्यापूर्वी गाळमुक्त होणार, श्रमदानातून टाक्यांची साफसफाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 5:12 AM