शहरात पाण्याची उधळपट्टी
By Admin | Published: July 24, 2015 03:01 AM2015-07-24T03:01:27+5:302015-07-24T03:01:27+5:30
: मोरबे धरणामुळे जलसंपन्न झालेली नवी मुंबई महानगरपालिका पाण्याची उधळपट्टी करू लागली आहे. शहरात तब्बल ८० दशलक्ष लीटर (१९ टक्के) पाणीगळती होत
नवी मुंबई : मोरबे धरणामुळे जलसंपन्न झालेली नवी मुंबई महानगरपालिका पाण्याची उधळपट्टी करू लागली आहे. शहरात तब्बल ८० दशलक्ष लीटर (१९ टक्के) पाणीगळती होत असल्याचे उघड झाले आहे. स्थायी समितीमध्ये याविषयी लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त करून प्रशासनास धारेवर धरले आहे.
स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. मोरबे धरणामुळे शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. उन्हाळ्यात सर्व महापालिकांना पाणीकपात करावी लागत असताना नवी मुंबईकरांना मात्र मुबलक पाणी मिळते. परंतु साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाण्याची उधळपट्टी वाढू लागली आहे. पिण्याचे पाणी उद्यान व इतर कामांसाठीही वापरले जात आहे. शहरात होणारा पाणीपुरवठा व पाणीगळतीविषयी नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये प्रश्न उपस्थित केला होता.
याविषयी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘शहरात सद्यस्थितीत ४२१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी १९ टक्के पाण्याची गळती होत आहे. एकूण पाण्यापैकी तब्बल ८० दशलक्ष लिटर पाण्याची गळती होत आहे. हे प्रमाण कोपरखैरणे व दिघा परिसरातील एकूण रहिवाशांना जेवढे पाणी लागते तेवढे आहे. याविषयी नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. पाणीगळतीची चौकशी झाली पाहिजे. नक्की पाणी कुठे मुरत आहे हे पाहून ठोस उपाययोजना
करण्याची मागणी शिवराम पाटील यांनी केली.
ऐरोली व दिघा परिसरांतील नागरिकांना वारंवार शट्डाऊनला सामोरे जावे लागत असल्याचे एम. के. मढवी यांनी निदर्शनास आणून दिले. झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही.
नागरिकांना नळजोडणी वेळेवर
मिळत नसल्याची खंत अपर्णा
गवते व जगदीश गवते यांनी व्यक्त केली.
सीआरझेडमुळे भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना पाणीपुरवठा होत नसल्याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेने स्काडा तंत्राचा वापर केला होता, त्याचा काय उपयोग झाला, अशी विचारणा रवींद्र इथापे यांनी केली.
झोपडपट्टीमध्ये अनेकांना पाणी दिले जात नसून त्यांचा नैसर्गिक हक्क डावलला जात असल्याचे रामचंद्र घरत यांनी स्पष्ट केले आणि नळजोडणीची प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली. सभागृहनेते जयवंत सुतार यांनीही चोरीच्या नळजोडणी तपासाव्यात. पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी केली. शहरात पाणी मुबलक असले तरी त्याचा योग्य वापर झाला पाहिजे, अन्यथा भविष्यात गंभीर परिणाम होतील, असेही निदर्शनास आणून दिले.