पनवेल : ऐन दिवाळीत खारघर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरळीत झालेला पाणीपुरवठा निवडणुका संपताच पुन्हा खंडित झाल्याने खारघरवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खारघर शहरातील खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा हे विषय रहिवाशांच्या जिव्हाळ्याचे आहेत. सिडको अथवा पालिकेच्या मार्फत हे विषय सुटत नसल्याने खारघर शहरात नोटा मोहीम सुरू झाली होती. पनवेल विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर नोटाला मतदान करण्यात आले. यावरून मूलभूत सुविधांवरून रहिवाशांची प्रचंड नाराजी असल्याचे दिसून येत आहे. ऐन दिवाळीत पाणी नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत निवडणुका संपताच पुन्हा एकदा शहरात अपुरा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खारघर शहराला ७० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्याच्या घडीला खारघर शहराला केवळ ५५ ते ६० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे, खारघर शहरात मोठ्या संख्येने गृहप्रकल्प उभारले जात असल्याने पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील दोन वर्षांपासून ही समस्या वाढत चालली असताना सिडकोच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविला गेलेला नाही. शहरातील सेक्टर १२, ११, ३६, १० तसेच २१ मधील काही सोसायटींमध्ये अपुºया पाणीपुरवठ्याची समस्या आहे. यासंदर्भात नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षकांना शहरातील पाणीसमस्या सोडविण्याची विनंती केली आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर रहिवाशांना घेऊन हंडा मोर्चा काढला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.शहरातील अपुºया पाणीपुरवठ्यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली आहे. त्यानुसार पाणी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी रात्री पाणीपुरवठा सुरळीत होईल. - सुजित जाधव, पाणी पुरवठा अधिकारी, सिडको खारघर