पनवेल : तालुक्यातील बोंडारपाडा येथील विहिरीचे बांधकाम गुरुवारी कोसळले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.
बोंडारपाडा ही आदिवासीवाडी असून येथील नागरिक विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरतात. ही विहीर २००९ मध्ये बांधण्यात आली. मात्र, अवघ्या दहा वर्षांत ती कोसळल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. विहिरीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
बोंडारपाडा गावामध्ये २५ ते २६ कुटुंबे असून याच विहिरीच्या पाण्यावर ग्रामस्थ आपली तहान भागवितात. गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने विहीर कोसळली. विहिरीचे बांधकाम दगडाचे आहे. मात्र, दगड रचताना वापरण्यात आलेले सिमेंट निकृष्ट दर्जाचे असावे. त्यामुळेच पावसाचा जोर वाढताच विहिरीचा एका बाजूचा भाग खचला आणि विहीर कोसळली.
पावसात विहीर कोसळल्याने ऐन पावसाळ्यात बोंडारपाडा गावातील नागरिकांकडे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गावाच्या आजूबाजूला पिण्याच्या पाण्याची दुसरी विहीर नसल्यामुळे महिलांना बोअरवेल किंवा इतर ठिकाणांवरील विहिरीवरून पिण्याचे पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ही विहीर कोसळल्याने शंभरहून अधिक नागरिकांची गैरसोय झाली आहे. याबद्दल पंचायत समितीचे बीडीओ धोंडू तेटगुरे यांना विचारले असता बोअरवेलमध्ये पाइप टाकून पाण्याचा प्रश्न निकाली काढणार असल्याचे सांगितले.