वाशीमध्ये जलवाहिनीच्या सुरक्षेला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:10 AM2018-05-25T04:10:00+5:302018-05-25T04:10:00+5:30

सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याची मागणी; प्रशासनाचे दुर्लक्ष्

Water security in Vashi | वाशीमध्ये जलवाहिनीच्या सुरक्षेला तडे

वाशीमध्ये जलवाहिनीच्या सुरक्षेला तडे

googlenewsNext

नवी मुंबई : पामबीच रोडवरून कोपरखैरणेकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पामबीच गॅलरियाच्या समोरील बाजूला नाल्यातील भराव खचू लागला आहे. पिलरलाही लहान तडे जाऊ लागले असून, महापालिकेने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होऊ लागली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी मोरबे ते सीबीडी व तेथून पूर्ण शहरभर जलवाहिन्यांचे जाळे तयार केले आहे. प्रतिदिन सरासरी ३९२ एमएलडी पाणीपुरवठा शहराला केला जातो. यासाठी तब्बल ९७२ किलोमीटर लांबीच्या मुख्य व उप जलवाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. मुख्य जलवाहिन्या अनेक ठिकाणी नाले व गटारांना लागून आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पिलरचे बांधकाम करून त्यावर पाइप बसविण्यात आले आहेत. जलवाहिन्या टाकून दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असून, आता सर्व वाहिन्यांचे सुरक्षा आॅडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे; पण याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी दरम्यान नैसर्गिक नाल्याच्या काठावरून जलवाहिनी गेली आहे. वर्षभर नाल्यातून पाणी वाहत असते. पावसाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे नाल्याच्या किनाºयांची झीज होऊ लागली आहे. त्याचा परिणाम जलवाहिनीच्या पिलरवरही होऊ लागला आहे. पामबीच गॅलरिया मॉलच्या समोरील बाजूला जवळपास १५पेक्षा जास्त पिलरच्या तळाचे प्लास्टर उखडले आहे.
पामबीचवरून जाणाºया काही दक्ष नागरिकांनी जलवाहिनीच्या सुरक्षेला तडे जात असल्याकडे लक्ष वेधले आहे. पिलरचे फोटो काढून सोशल मीडियावरून पाठविण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी पिलरसाठी खोल पाया घातला असल्याने जलवाहिन्यांना भीती नसल्याचे काही अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे; परंतु अशाच प्रकारे झीज सुरू झाली तर भविष्यात मुसळधार पावसामध्ये जलवाहिनी खाली कोसळण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने याविषयी गांभीर्याने लक्ष द्यावे. पूर्ण जलवाहिनीचे सर्वेक्षण करण्यात यावे. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात यावे. ज्या पिलरच्या खालील बाजूला सिमेंट उखडले आहे, तेथे तत्काळ आवश्यक उपाययोजना कराव्या, अशी मागणीही केली जात आहे. याविषयी महापालिकेचे कार्यकारी अभियंता मनोहर सोनावणे यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही. वाशी विभागातील अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी पाइपलाइनची जबाबदारी आमच्याकडे नाही; पण जलवाहिनीचे पिलर उभे करताना खोल पाया काढलेला आहे. यानंतरही याविषयी माहिती संबंधित विभागाला कळवून आवश्यक काळजी घेण्यास सांगितले जाईल, असे स्पष्ट केले.

संपूर्ण नाल्याचीच दुरुस्ती करावी
वाशी येथील राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक प्रकाश मोरे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पामबीच रोडला सर्व्हिस रोड नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. येथील संपूर्ण नैसर्गिक नाल्याची दुरुस्ती करण्यात यावी. त्यावर सर्व्हिस रोड तयार करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. पाइपलाइनच्या बाजूची जमीन खचत असल्यास सर्वेक्षण करून विनाविलंब दुरुस्तीचे काम करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियातून फोटो व्हायरल
पामबीच गॅलरियासमोरील नाल्यात जलवाहिनीच्या पिलरला धोका असल्याचे फोटो काही दक्ष नागरिकांनी काढले आहेत. फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होऊ लागले आहेत. जलवाहिनीला धोका असल्याचा मेसेज लिहिला जात आहे. महापालिका प्रशासनाने याविषयी तत्काळ सर्वेक्षण करून उपाययोजना करावी, अशी मागणीही होऊ लागली आहे.

Web Title: Water security in Vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी