नवी मुंबई : रस्त्यांच्या कामादरम्यान तांत्रिक बाबींकडे ठेकेदारांकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या आराखड्यात त्रुटी निर्माण होऊन जागोजागी पाणी तसेच गाळ साचण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, या प्रकारामुळे दुचाकीस्वारांना अपघातांचे निमंत्रण मिळत आहे.शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करताना रस्त्याचा उतार लगतच्या नाल्याच्या दिशेने करणे आवश्यक आहे. याकरिता रस्त्यांची कामे केली जाताना ती अत्यंत बारकाईने तपासली गेली पाहिजेत. मात्र, नवी मुंबई महापालिकेकडून ठेकेदारांना काम दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याला बगल दिली जाते. यामुळे तांत्रिक बाबींचे गांभीर्य लक्षात न घेता, सरसकट डांबरीकरण उरकण्याचे काम ठेकेदाराकडून केले जाते. याकरिता रस्त्याचा उतार योग्य झाला आहे का हे देखील तपासले जात नाही. परिणामी शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळते. त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हाच निष्काळजीपणा पावसाळ्यात देखील डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यांचा उतार योग्य दिशेला नसल्याने मध्यभागी पाणी साचणे, अथवा गटारांच्या विरुद्ध दिशेने पाणी वाहणे असे प्रकार रस्त्यांवर पाहायला मिळत आहेत. त्यातूनच काही ठिकाणी पाण्यासोबत वाहून आलेला मातीचा गाळ रस्त्यालगत साचत आहे. यामुळे त्याठिकाणी रस्ता निसरडा होऊन दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रकार घडत आहेत. शिवाय अशा ठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण होत आहे. ही बाब पालिकेकडून गांभीर्याने घेऊन रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या सदोष कार्यपद्धतीत सुधार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. भविष्यात रस्त्यांचे डांबरीकरण करताना या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
रस्त्यांच्या कामामधील त्रुटीमुळेच पाणी, गाळ साचण्याचे प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:20 AM