दासगाव : महाड तालुक्यातील खुटील गावात चोरांनी बंद घरातील लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील दोन ठिकाणी विजेचे ट्रान्सफॉर्मर उतरवून हे ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील कॉपर वायर चोरांनी लंपास केली. यामध्ये दासगाव परिसराला नळपाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलच्या ट्रान्सफॉर्मरचा समावेश आहे. यामुळे या परिसरातील जवळपास दोन गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.महाड तालुक्यात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला असून शहरातील दुचाकींमधील पेट्रोल चोरीचे प्रकार घडले असतानाच खुटील गावात बुधवारी अज्ञात चोरांनी बंद घरातील सोने आणि रोख रक्कम लंपास केले आहे. चोरीच्या या घटना ताज्या असतानाच महाडजवळील सावित्री पुलानजीक महामार्गालगत असलेल्या एका ट्रान्सफॉर्मरमधून चोरांनी कॉपर वायरची चोरी केली. रस्त्यालगत असलेला हा ट्रान्सफॉर्मर चोरांनी खाली उतरविला आणि तो फोडून त्यातील कॉपर वायर लंपास केली. दासगाव परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलचा हा ट्रान्सफॉर्मर असल्याने या परिसरातील पाणीपुरवठा सध्या ठप्प झाला आहे. याबाबत महावितरणचे कर्मचारी अमोल गायकवाड यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ७५ किलो वजनाच्या या कॉपर कॉईलची किंमत ७ हजार इतकी आहे.दासगाव परिसरातील वहूर आणि दासगाव या दोन गावांना सदर जॅकवेलमधून पाणीपुरवठा होतो. या जॅकवेलचा ट्रान्सफॉर्मरच अज्ञात चोरांनी फोडल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. महावितरण कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली. मात्र या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसवला नाही. यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या चोरीचा तपास महाड शहर पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
कॉईल चोरीमुळे पाणीटंचाई
By admin | Published: November 15, 2015 12:06 AM