एकीकडे पाणी टंचाई दुसरीकडे प्रचंड नासाडी, कोपरा पुलावर पाणीगळती रोखणार कोण?
By वैभव गायकर | Published: May 5, 2023 06:35 PM2023-05-05T18:35:01+5:302023-05-05T18:36:18+5:30
एकीकडे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरु आहे. त्यातच याठिकाणी लागलेली पाणी गळती थांबता थांबेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वैभव गायकर
पनवेल - सिडकोने घाई घाईने उभारलेल्या नव्या कोपरा पुलावर मागील आठवडाभर पाणी गळती सुरु आहे. याच ठिकाणावरून नवी मुंबई महानगरपालिकेची जलवाहिनी गेली आहे. मात्र गळती लागलेली जलवाहिनी कोणाची आहे. ही बाब स्पष्ट होत नसली, तरी ददरोज मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी याठिकाणी सुरु आहे. एकीकडे पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई सुरु आहे. त्यातच याठिकाणी लागलेली पाणी गळती थांबता थांबेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
खारघर शहरात मागील महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र भुषण सोहळ्यासाठी सिडकोने एका रात्रीत कोपरा पुल मातीचा भराव टाकून उभारला होता.शहरातील मुख्य नाल्यावर केवळ एक पाईप टाकून घाईत उभारताना सिडकोने सर्व नियम पायदळी तुडवले होते.या पुलामुळे शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटल्याने नागरिकांनी याचे स्वागत केले होते. मात्र याठिकाणी लागणारी पाणी गळती,भविष्यात पावसाच्या पाण्याला होणारा अडथळा लक्षात घेता सिडकोचे नियोजनशून्य कारभार यामुळे पाहावयास मिळत आहे.
याठिकाणाहून दररोज येजा करणारे गुणेश ठाकुर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.रोज सकाळी याठिकाणी पाण्याला गळती लागुन लाखो लिटर पाणी वाहून सायन पनवेल महामार्गावर जातो.रोज प्रकार घडून देखील याबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर खेदाची बाब असल्याचे गुणेश ठाकुर यांनी सांगितले.एकीकडे पनवेल शहरात पाण्याची टंचाई असताना अशाप्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर हि शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.