नवी मुंबईसह खारघर,कामोठेत उद्या पाणीबाणी; जलवाहिनीची पावसाळापूर्वी दुरुस्ती

By नामदेव मोरे | Published: May 27, 2024 07:59 PM2024-05-27T19:59:53+5:302024-05-27T20:02:17+5:30

बुधवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा

Water shortage tomorrow in Kharghar, Kamothe along with Navi Mumbai | नवी मुंबईसह खारघर,कामोठेत उद्या पाणीबाणी; जलवाहिनीची पावसाळापूर्वी दुरुस्ती

नवी मुंबईसह खारघर,कामोठेत उद्या पाणीबाणी; जलवाहिनीची पावसाळापूर्वी दुरुस्ती

नवी मुंबई : मोरबे धरण ते दिघा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे नवी मुंबई, खारघर व कामोठे परिसरातील पाणीपुरवठा २८ मे रोजी बंद राहणार आहे. बुधवारीही कमी दाबाने पाणी येणार असल्यामुळे नागरिकांनी त्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सीबीडी ते ऐरोली दरम्यान मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. खारघर ते कामोठे वसाहतीलाही मोरबे धरणातून पाणी पुरवले जाते. पावसाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत करता यावा यासाठी मोरबे धरण ते दिघा दरम्यानच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. 

यामुळे मंगळवारी सकाळी १० ते रात्री १२ पर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. संपूर्ण शहराला दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर कामोठे विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी पाणी पुरवले जाणार असले तरी ते कमी दाबाने उपलब्ध होईल असे महानगरपालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी सांगितले आहे.

एक दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार असल्यामुळे व दुसऱ्या दिवशी कमी पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी साठ्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title: Water shortage tomorrow in Kharghar, Kamothe along with Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.