शाळेत तीन दिवसांपासून पाणी बंद; २५०० विद्यार्थी नैसर्गिक विधीसाठी घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 07:07 AM2023-12-09T07:07:30+5:302023-12-09T07:08:02+5:30

नवी मुंबई पालिकेविरोधात नाराजी; पिण्याचे बाटलीभर पाणी पुरवून वापरण्याची वेळ

Water shut off in school for three days; 2,500 students home for natural rituals | शाळेत तीन दिवसांपासून पाणी बंद; २५०० विद्यार्थी नैसर्गिक विधीसाठी घरी

शाळेत तीन दिवसांपासून पाणी बंद; २५०० विद्यार्थी नैसर्गिक विधीसाठी घरी

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानात देशात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्याअभावी नैसर्गिक विधीसाठी घर गाठावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाण्याच्या वीजपंपात बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून शाळेत पिण्यासह वापराच्या पाण्याची टंचाई भासत आहे. 

घशाची कोरड भागवण्यासाठी विद्यार्थी पाण्याची बाटली सोबत घेऊन येत आहेत. परंतु, नैसर्गिक विधीसाठी मात्र त्यांना घर अथवा जवळचे सार्वजनिक शौचालय गाठावे लागत आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाच्या हलगर्जीमुळे घणसोली सेक्टर ७ येथील महापालिका शाळेतील सुमारे अडीच हजार विद्यार्थी व शिक्षकांचे तीन दिवसांपासून हाल होत आहेत. येथे महापालिकेच्या शाळा क्रमांक ४२, ७६ व १०५ अशा तीन शाळा भरतात. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या दोन, तर हिंदी माध्यमाची एक शाळा आहे. एकाच इमारतीमध्ये भरणाऱ्या या तीन शाळांमध्ये सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिकत आहेत. सुमारे ३५० शिक्षक कार्यरत आहेत. भूमिगत टाकीतून पंपाद्वारे पाणी पुरवले जाते. परंतु, बुधवारी त्यात बिघाड झाला. त्याच दिवशी दुरुस्ती होणे अपेक्षित असताना महापालिकेचा विद्युत विभाग व संबंधित सर्वच विभागांकडून दुर्लक्ष झाले. विद्यार्थी व शिक्षक पिण्यासाठी पाण्याची बाटली सोबत घेऊन येत आहेत. 

टाकीचे दोन्ही पंप खराब झाल्याने शाळेला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पंप टाकीच्या तळाशी असल्याने काढण्यासाठी टाकीतील पाण्याचा उपसा करण्यात एक दिवस गेला. गुरुवारी दोन्ही पंप दुरुस्तीसाठी पाठविले आहेत. - सखाराम खाडे, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग

Web Title: Water shut off in school for three days; 2,500 students home for natural rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.