द्रोणागिरी जेएनपीटीसह तळोजामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
By नामदेव मोरे | Published: September 12, 2023 06:36 PM2023-09-12T18:36:55+5:302023-09-12T18:37:26+5:30
शनिवार रविवार कमी दाबाने पाणीपुरवठा : हेटवणे जलवाहिनीची देखभाल दुरूस्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम १५ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. यामुळे शुक्रवारी दिवसभर द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजासह हेटवणे जलवाहिनीवरून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
सिडकोच्या माध्यमातून पनवेल, उरण परिसराला हेटवणे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीची वेळोवेळी देखभाल दुरूस्ती करावी लागते. शुक्रवारी सकाळी ९ वाजता दुरूस्तीचे काम सुरू केले जाणार आहे. यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजे पर्यंत हेटवणे जलवाहिनीवरून पाणी पुरवठा होणाऱ्या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार व रविवार कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. पाण्याचा अपव्यय करू नये असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे.