धामोळे आदिवासी पाड्याला टँकरने पाणीपुरवठा
By admin | Published: May 13, 2017 01:22 AM2017-05-13T01:22:37+5:302017-05-13T01:22:37+5:30
खारघरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या धामोळे आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी चांगलीच पायपीट
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : खारघरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या धामोळे आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना गेल्या दोन वर्षांपासून पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत होती. विशेष म्हणजे पाड्याला लागून असलेल्या गोल्फ कोर्सवरील गवतावर चोवीस तास पाण्याची फवारणी केली जात होती. मात्र आदिवासी पाड्यात मात्र पिण्याचे पाणीही मिळणे कठीण होते. या समस्येची दखल घेत आगरी कोळी युथ फाउंडेशनने स्वखर्चाने पाण्याचे टँकर सुरू केले. एकीकडे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकारणी व्यस्त असताना फाउंडेशनची ही मदत आदिवासी बांधवांना मोठी दिलासा देणारी ठरली आहे.
पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन दोन वर्षांपासून बंद असलेल्या जलवाहिनीतून पाणी सोडण्यास सुरु वात केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवला आहे. याची दखल घेत आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी पाड्याची पाहणी केली. यावेळी गावातील दोन विहिरी कोरड्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे फाउंडेशनने स्वखर्चाने याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला. विशेष म्हणजे पनवेल महापालिकेच्या प्रभाग ३ मध्ये असलेल्या आदिवासी पाड्याकडे एकही राजकीय पदाधिकारी फिरकला देखील नाही. पनवेल महानगर पालिकेचे खारघर विभागीय अधिकारी श्रीराम हजारे यांनी देखील या घटनेची दखल घेत दोन वर्षांपासून बंद असलेल्या जलवाहिनीतून पाणी सोडण्यास सुरु वात केली. सिडकोसोबत समन्वय साधून दिवसातून दीड तास पाणी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.