नवी मुंबईत तीन दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

By नामदेव मोरे | Published: June 14, 2024 04:41 PM2024-06-14T16:41:39+5:302024-06-14T16:41:51+5:30

मोरबे धरणात ४१ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

Water supply stopped in Navi Mumbai for three days in the evening; A call to conserve water | नवी मुंबईत तीन दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नवी मुंबईत तीन दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नवी मुंबई : मोरबे धरणामध्ये ४१ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक विभागात आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन केले आहे.

               नवी मुंबई महानगरपालिकेला बेलापूर ते ऐरोलीपर्यंत मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये खारघर, कामोठे परिसरामध्येही मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये पाणी बचत करता यावी, यासाठी प्रत्येक विभागात आठवड्यातून दोन दिवस सायंकाळी पाणी कपात सुरू केली होती. रोज सकाळी नियमित पाणीपुरवठा केला जात होता. सद्य:स्थितीमध्ये धरणामध्ये ४१ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. पाऊस पडला नाही तरी २५ जुलैपर्यंत शहरवासीयांना पाणी पुरविणे शक्य आहे; परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळच्या पाणी कपातीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापुढे आठवड्यातून तीन दिवस सायंकाळी पाणीपुरवठा केला जाणार नाही.

             पुरेसा पाऊस पडून धरणाची पातळी वाढत नाही तोपर्यंत उपलब्ध जलसाठा जपून वापरावा लागणार आहे. पाण्याची उधळपट्टी थांबवावी यासाठी सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. सकाळी पाणीपुरवठा नियमित होणार असून, सायंकाळी आठवड्यातून तीन दिवस कपात केली जाणार आहे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

विभागनिहाय सायंकाळच्या पाणीपुरवठा बंदचे वेळापत्रक
विभाग - पाणी बंदचा वार
बेलापूर - सोमवार, बुधवारी, शुक्रवार
नेरूळ - मंगळवार, गुरुवार, शनिवार
तुर्भे - मंगळवार, गुरुवार, रविवार
वाशी - सोमवार, बुधवार, शुक्रवार
कोपरखैरणे - मंगळवार, गुरुवार, शनिवार
घणसोली - बुधवार, शुक्रवार, रविवार
ऐरोली - मंगळवार, शुक्रवार
खारघर, कामोठे - सोमवार, गुरुवार, शनिवार

मोरबे धरणातील पाणीसाठ्याचा तपशील
धरणाची लांबी - ३२५० मीटर
पाणीसाठवण क्षेत्र - ५७८९ हेक्टर
ग्रॉस स्टोरेज - १९० एमसीएम
सद्य:स्थितीमधील साठा - ५० एमसीएम
डेड साठा - ५.५२ एमसीएम
बाष्पीभवन - १०.६८ एमसीएम
कधीपर्यंत पुरणार? - ४१ दिवस

धरणातील गतवर्षाच्या तुलनेतील साठा
वर्गीकरण - २०२३ - २०२४
आजचा पाऊस - ६.४० मि.मी. - ० मि.मी.
आतापर्यंतचा पाऊस - ११.२० मि.मी. - ६९.४० मि.मी.
धरण पातळी - ६९.३९मी. - ६९.४२मी.
ग्रॉस स्टोअरेज - ४९.९५एमसीएम - ५०.१०एमसीएम
 

Web Title: Water supply stopped in Navi Mumbai for three days in the evening; A call to conserve water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.