पाणीपुरवठा सभापतींना घेराव, सत्ताधारी विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:17 AM2018-04-14T03:17:45+5:302018-04-14T03:17:45+5:30
पनवेल शहराला भीषण पाणीसमस्येने ग्रासले असताना, सत्ताधाऱ्यांमार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या जात नसल्याने विरोधकांनी १३ एप्रिल रोजी महापौरांना घेराव घालून त्यांना यासंदर्भात जाब विचारण्याचा बेत आखला होता.
पनवेल : पनवेल शहराला भीषण पाणीसमस्येने ग्रासले असताना, सत्ताधाऱ्यांमार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या जात नसल्याने विरोधकांनी १३ एप्रिल रोजी महापौरांना घेराव घालून त्यांना यासंदर्भात जाब विचारण्याचा बेत आखला होता. मात्र, महापौर अनुपस्थित असल्याने विरोधकांनी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांच्या दालनात घुसून त्यांना घेराव घातला.
या वेळी शेकापचे नगरसेवक गुरुनाथ गायकर, प्रमोद भगत, ज्ञानेश्वर पाटील, अजीज पटेल, सुरेखा मोहोकर, सारिका भगत, गणेश कडू, रवि भगत आदीसह शेकाप कार्यकर्त्यांचा समावेश होता, या वेळी पाणीपुरवठा सभापतींच्या दालनात घुसून त्यांना पाणीप्रश्नावर काय उपाययोजना राबवत आहात, यासंदर्भात जाब विचारण्यास सुरु वात केली. या वेळी बाविस्करांना जाब विचारत असताना महिला बाल कल्याण समितीच्या सभापती दर्शना भोईर यांनी या ठिकाणी प्रवेश करीत संबंधित जाब आयुक्तांना विचारण्याची विनंती शेकाप सदस्यांना केली. या वेळी भडकलेल्या शेकाप नगरसेवक व दर्शना भोईर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मोठ्या प्रमाणात उडालेला हा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मध्यस्ती करीत, पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांच्या दालनात प्रवेश केला. या वेळीदेखील विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यात मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमक उडाली. संबंधित जाब आम्हालाच न विचारता आयुक्तांनाही विचारा, असा सवाल या वेळी परेश ठाकूर यांनी विरोधकांना केला. पनवेलच्या पेटलेल्या पाणीप्रश्नावर जाब विचारण्याकरिता आलेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा सभापती यांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी केली.
विशेष म्हणजे, पाण्याच्या प्रश्नावरून आयुक्तांसमोर बैठक घेऊ, असा आग्रह सत्ताधारी भाजपा पदाधिकाºयांनी धरला. पालिका मुख्यालयात सुरू असलेला गोंधळ पाहता, आयुक्त दालनाबाहेर आले. या वेळी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे व सभागृहनेते परेश ठाकूर, पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांनी संबंधित बाब आयुक्तांच्या कानावर घातली. विरोधक पाणीप्रश्नावरून गोंधळ घालत असल्याचे आयुक्तांना सांगितले. आयुक्तांनी प्रशासनाची बाजू मांडत एकत्र बसून यासंदर्भात तोडगा काढू, असे सांगितले.
>सत्ताधाºयांना मुख्यमंत्र्यांनी घरचा आहेर दिला असला, तरी त्यांचे आयुक्तपुराण अद्याप संपलेले नाही. पाणीप्रश्नावरून सत्ताधारी अद्याप आयुक्ताकडे बोट दाखवत आहेत. पनवेलमधील नागरिकांच्या साध्या पिण्याची पाण्याची व्यवस्था न करू शकलेल्या सत्ताधाºयांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते
पाणीप्रश्नावर आम्ही गंभीर आहोत. याकरिता विविध योजना आम्ही आखत आहोत. मात्र, पाणीप्रश्नावरून सत्ताधाºयांना टार्गेट करणे चुकीचे आहे. प्रशासनालाही याबाबत जाब विचारणे गरजेचे आहे.
- नीलेश बाविस्कर,
सभापती, पाणीपुरवठा समिती