बाजार समितीमधील धोकादायक इमारतीचा पाणीपुरवठा खंडीत; महानगरपालिकेची कारवाई
By नामदेव मोरे | Published: June 19, 2024 06:50 PM2024-06-19T18:50:43+5:302024-06-19T18:50:49+5:30
कांदा - बटाटा मार्केटचा वापर थांबविण्याची नोटीस
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा- बटाटा, लसूण मार्केट अतीधोकादायक घोषीत करण्यात आली आहे. या मार्केटचा वापर तत्काळ थांबविण्याची नोटीस महानगरपालिकेने दिली आहे. मंगळवारी येथील पाणीपुरवठाही थांबविण्यात आला आहे. मार्केटमध्ये कोणतीही दुर्घटना घडली तर त्यास मालमत्ताधारक जबाबदार राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बाजार समितीमधील कांदा, बटाटा व लसूण मार्केट पुर्णपणे धोकादायक झाले आहे. याशिवाय मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह इमारतही अतीधोकादायक घोषीत करण्यात आली आहे. सोमवारी बाजार समिती मुख्यालयाच्या इमारतीमधील सचीव पी. एल. खंडागळे यांच्या दालनातील स्लॅबचे प्लास्टर कोसळले. सुट्टीअसल्यामुळे सचीव बचावले. या दुर्घटनेची गंभीर दखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे. गतवर्षी कांदा बटाटा मार्केटमधील व्यापारी गाळ्यासमोरील स्लॅबचा काही भाग कोसळला होता. यावर्षी सचीवांच्या दालनामध्येच प्लास्टर कोसळले. पाऊस सुरू झाल्यानंतर मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी मार्केटमधील गाळ्यांचा वापर तत्काळ थांबविण्याची नोटीस महानगरपालिकेने दिली आहे.
महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी अतीधोकादायक कांदा बटाटा मार्केटचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे आता मार्केटमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. बाजार समिती मुख्यालय इमारतीलाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मार्केट अतीधोकादायक आहे. परंतु मुख्यालयाची इमारत अतीधोकादायक घोषीत झालेली नाही. त्यामुळे तेथील पाणीपुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी बाजार समितीने केली आहे. दरम्यान पाणी पुरवठा बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय सुरू झाली आहे.
बाजार समितीमधील अतीधोकादायक घोषीत करण्यात आलेल्या मार्केटचा पाणी पुरवठा मंगळवारी खंडीत केला आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नियमाप्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे.- डॉ. राहूल गेठे, उपायुक्त महानगरपालिका
महानगरपालिका प्रशासनाने कांदा - बटाटा मार्केटचा पाणीपुरवठा बंद केला आहे. याच मार्केटमध्ये मुख्य प्रशासकीय कार्यालय असून येथील पाणीपुरवठाही बंद झाला आहे. सभापती व आम्ही महानगरपालिका प्रशासनाच्या हे निदर्शनास आणून दिले असून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.- पी. एल. खंडागळे, सचीव बाजार समिती