नवी मुंबई : इमारती धोकादायक असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून नवी मुंबई महापालिकेने येथील एपीएमसी मार्केटच्या कांदा-बटाटा मार्केटसह सुविधा इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे २० जूनपासून येथे काम करणाऱ्या माथाडी कामगारांसह व्यापारी यांचे हाल सुरू झाले होते. त्यामुळे माथाडी कामगारांनी हा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सोमवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट महापालिकेवर धडक दिली. त्यानंतर आयुक्त कैलास शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर महापालिकेने पाणीपुरवठा सुरू केल्याने कामागांनी आनंद व्यक्त केला आहे.
कांदा-बटाटा मार्केट परिसरात व्यापारी आणि माथाडी कामगार मिळून पाच हजार लोक काम करतात. या सर्वांचे २० जूनपासून गेले चार चार दिवस पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू होते. त्यात विशेषत: महिला कामगार, ग्राहकांची तर मोठी कुचंबणा होत होती. मात्र, एपीएमसी प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून महापालकेकडे बोट दाखविले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी माथाडी कामगारांनी सोमवारी सकाळी अचानक मार्केट बंद ठेवून महापालिकेकडे कुच केले. त्यात बस, ट्रक, मोटारसायकलींसह कामगार आपले नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकले. येथे द्वारसभा घेऊन नरेंद्र पाटील यांनी महापालिकेवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आयु्क्त कैलास शिंदे सोबत चर्चा केली. आयुक्तांनी व्यापारी हमी पत्र लिहून देण्याच्या अटीवर मार्केटचा पाणीपुरवठा तत्काळ सुरू केला.
आयुक्तांनी मागितले हे हमीपत्र
कांदा-बटाटा मार्केटची इमारत अतिधोकादायक झाली आहे. यामुळे पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासनाच्या नियमानुसारच पाणीपुरवठा खंडित केल्याचे आयुक्त कैलास शिंदे यांनी माथाडी नेत्यांना सांगितले. त्यानंतर मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्याने आपला गाळा क्रमांक लिहून पावसाळ्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहू असे हमीपत्र लिहून दिल्यास पाणीपुरवठा त्वरीत सुरू कसे सांगितले. आयुक्तांची ही अट माथाडीनी मान्य केले. त्यानुसार येत्या दोन दिवसांत व्यापाऱ्यांनी हे हमी पत्र द्यायचे आहे. मात्र, ही बैठक संपल्यानंतर लगेच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे व्यापारी आणि माथाडींनी आनंद व्यक्त केला आहे.