नवी मुंबई : पाणीपुरवठा करणाऱ्या उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभाचा विद्युत जनित्र मध्यरात्री जळाल्याने घणसोली परिसराला महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा खंडित झाल्याने गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. सोमवारी दुपारी नवीन जनित्र बसविल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
घणसोली परिसराला महापालिकेच्या गावातील जिजामाता नगरातील उच्च आणि भूस्तरीय जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, रविवारी २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोटार पंपासाठी वीजपुरवठा करणारा १६० केव्ही क्षमतेचा जनित्र (ट्रान्सफॉर्मर) अचानक जळून गेला. त्यामुळे घणसोली परिसरातील ३० हजारांहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. सलग १३ तास पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी हंडे, कळशा आणि बादल्या घेऊन वणवण करावी लागली.घणसोली परिसरातील जिजामाता नगर, गावदेवी वाडी, समर्थ नगर, कोंबडी चाळ, आदिशक्ती नगर, चिंचआळी, ताराई नगर, रानकर आळी, कौल आळी तसेच पाटील आळी आदी परिसरांतील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अखेर सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून नवीन जनित्र बसविल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.