आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा होणार बंद, लॉकडाउननंतर टंचाई सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 02:15 AM2020-04-29T02:15:44+5:302020-04-29T02:15:51+5:30
लॉकडाउननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद करून शटडाउन घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे उप-अभियंता रणजीत बिरंजे यांनी दिली.
उरण : उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणात जून महिना अखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध असला तरी पाऊस लांबल्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून लॉकडाउननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद करून शटडाउन घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे उप-अभियंता रणजीत बिरंजे यांनी दिली.
उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यात रानसई एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती, उरण नगर परिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा केला जातो. रानसई धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने डिसेंबर २०१९ पासूनच सिडकोकडून पाणी घेण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबर २०१९ पासून सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज पाच एमएलडी इतके पाणी घेतले जात आहे.
सिडकोकडून घेण्यात येणारे पाच एमएलडी पाणीही कमी पडत असल्याने आणखी दोन असे एकूण सात एमएलडी पाणी वाढवून देण्याची मागणी एमआयडीसीने केली. याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप सिडकोने सहमती दर्शवलेली नाही.
>दुसºया टप्प्यातील संचारबंदीची मुदत ३ मे रोजी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. लॉकडाउननंतर आठवड्यातून एक दिवस ग्रामपंचायत आणि नगर परिषद क्षेत्रातील पाणीपुरवठा
बंद करून शटडाउन घेण्यात येणार आहे.
- रणजीत बिरंजे, उपअभियंता, उरण एमआयडीसी