नवी मुंबईसह खारघरमध्ये १० एप्रिलला पाणी पुरवठा बंद राहणार
By नामदेव मोरे | Published: April 6, 2023 06:29 PM2023-04-06T18:29:28+5:302023-04-06T18:29:49+5:30
११ एप्रिललाही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
नवी मुंबई :
पनवेल - कर्जत दुहेरी रेल्वे मार्गासाठी जलवाहिनी स्थलांतर करण्यात येणार आहे. या कामासाठी १० एप्रिलला नवी मुंबईसह, कामोठे, खारघर परिसरातील पाणी पुरवठा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. ११ एप्रिललाही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र व मोरबे ते दिघा मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीचे काम करणे आवश्यक आहे. पनवेल - कर्जत दुहेरी रेल्वे मार्गासाठी चिखले येथे जलवाहिनी स्थलांतर करावी लागणार आहे. कळंबोली येथे एक्सप्रेस व पुलाखाली दिवा - पनवेल रेल्वे लाईन क्रॉसिंग करून जलवाहिनी टाकण्याचे कामही केले जाणार आहे. या कामांसाठी १० एप्रिल सकाळी १० ते ११ एप्रिल सकाळी १० असे चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय ११ एप्रिलला सकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार असून सायंकाळी टप्याटप्याने पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे. या दोन दिवस पाणी जपून वापरावे. पुरेसा साठा करून ठेवावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.