सिकंदर अनवारे / दासगांवमहाड तालुक्यातील रायगड किल्ल्याजवळ असलेल्या कोतुर्डे धरणातून तालुक्यातील २२ ग्रामपंचायती, तसेच महाड शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. हे धरण महाड शहरापासून १२ किमी अंतरावर असून गांधारी नदीवर बांधण्यात आले आहे. हे धरण लघुपाटबंधारे कोलाड यांच्याकडे असून पाणी वसुली धरणाची देखरेख त्यांच्या अधिपत्याखालीच होते. सध्या नदीत पाण्याचा साठा असल्याने लघुपाटबंधारे विभाग या धरणातून पाणी सोडत नसून, अनेक ग्रामपंचायतींनी या नदीला ठिकठिकाणी बंधारे बांधल्याने शेवटच्या टोकाला असलेल्या दासगाव, वहूर, केंबुर्ली, गांधारपाले, करंजखोल या गावांच्या जॅकवेल ठिकाणी पाणीच नसल्याने या गावच्या नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. यामुळे या गावांना पाणीटंचाईची झळ बसली असून लघुपाटबंधाऱ्याच्या या धोरणामुळे काही दिवसातच जनता रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती महाड तालुका पंचायत समिती सदस्य विनीता चांढवेकर यांनी दिली आहे.महाड तालुक्यातील किल्ले रायगडजवळच असलेल्या कोतुर्डे या गावाच्या ठिकाणी धरण आहे. या धरणाच्या पाण्यावर या विभागातील २२ ग्रामपंचायती, तसेच महाड शहराची नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. हे धरण महाड शहरापासून १२ किमी अंतरावर आहे. या धरणाचे पाणी गांधारी नदीमध्ये फेब्रुवारीपासून सोडण्यात येते. दोन वर्षांपूर्वी या धरणाला भलेमोठे भगदाड पडले होते. यामुळे २२ ग्रामपंचायतींची, तसेच महाड शहराची नळपाणी पुरवठा योजना धोक्यात आली होती. गेल्या वर्षी लघुपाटबंधारे विभागाने या धरणाच्या डागडुजीवर १८ लाख रुपये खर्च करून याची दुरुस्ती करत यावर असणारी योजना कायम ठेवली. दरवर्षी एप्रिल अखेरीस या धरणाच्या पाण्याची पातळी कमी होते. यामुळे धरणाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जॅकवेलजवळ पाणी राहत नाही. याचा फ टका दासगाव, वहूर, केंबुर्ली, साहीलनगर, गांधारपाले, करंजखोल यांना बसून या गावांची नळपाणी पुरवठा पुढील पावसापर्यंत ठप्प होती. यंदाच्या महाड तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे दरवर्षीपेक्षा येथील पातळीमध्ये अडीच फुटाने पाण्याची पातळी वाढलेली आहे. यामुळे महिन्यापर्यंत या धरणाचे पाणीपुरवठा होईल, असे लघुपाटबंधारे विभागाने अंदाज व्यक्त केला आहे.गांधारी नदीही बारमाही वाहणारी नसून पावसाळ्यानंतर कोतुर्डे धरणाच्या सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळेच वाहत असते. सध्याच्या परिस्थितीत या नदीमध्ये वाहणारे पाणी कमी झाले असून या नदीमध्ये कोतुर्डे ते मोहप्रे या १२ किमी अंतरावर अनेक गावांच्यानळपाणी पुरवठा योजनेच्या जॅकवेल आहेत. कमी झालेल्या पाण्याच्या पातळीमुळे प्रत्येकाने आपल्या जॅकवेलजवळ बंधारे बांधून पाणी अडवले आहेत. तसेच या भागामध्ये नदीलगत अनेक वीटभट्टी व्यावसायिक आहेत. मात्र त्यांनी देखील आपल्या उद्योगासाठी ठिकठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविले आहे. शेवटी असलेल्या दासगांव, वहूर, गांधारपाले, करंजखोल यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या जॅकवेल सध्या कोरड्याच पडल्या आहेत. त्याचप्रमाणे लघुपाटबंधारे विभाग दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नदीला पाणी सोडण्याचे काम करतो. त्यामुळे ते यावेळी ग्रा. पं. च्या पाणी सोडण्याच्या मागणीला धुडकावत आहेत. यामुळे दासगाव, वहूर, केंबुर्ली, साहीलनगर, गांधारपाले, करंजखोल या गावांची नळपाणी पुरवठा ठप्प झाली आहे. सध्या या गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
महाडमधील चार गावांतील नळपाणी योजना ठप्प
By admin | Published: December 26, 2016 7:07 AM