आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिकांची तहान भागविण्यासाठी करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे टँकरने करण्यात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टँकरने पुरविण्यात येणाऱ्या शुद्ध पाण्याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. नागरिकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी पुरवण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करण्याचे निर्देश पाणी व स्वच्छता विभागाने सर्व गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. कर्जत तालुक्यातील कोल्होरे आणि धामोते नळ पाणीपुरवठा योजनेमार्फत करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अशुद्ध आहे. येथील पाण्याची तपासणी रसायनीच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने २ मे २०१६ रोजी केली आहे. येथील पाण्यामध्ये १६ पेक्षा जास्त कोलोफॉर्म्सचे घटक आढळून आले आहेत. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल या विभागाने दिला आहे. विशेष म्हणजे याच नदीपात्रात कपडे धुणे, गायी-म्हशी आंघोळ करताना आढळून आल्या आहेत. तर दुसरीकडे तेथीलच पाणी थेट टँकरमध्ये भरले जात असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ३० गावे आणि १७८ वाड्या अशा एकूण २०८ ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने या ठिकाणी २८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोल्हारेचे उदाहरण डोळ््यासमोर असताना अन्य टँकरने पुरविण्यात येणारे पाणी खरोखरच शुध्द आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरमधील पाणी शुध्द करून दिले जाते की नाही हे पाहण्याची जबाबदारी प्रत्येक गट विकास अधिकाऱ्याची आहे. ग्रामपंचायतीने टीसीएल पावडरचा साठा पंचायतीमध्ये ठेवणे बंधणकारक आहे. टँकरचे पाणी पिण्याऱ्या नागरिकांनी आधी ते शुध्द आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन फक्त टँकर मंजूर करते, असे जिल्हा सामान्य प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टँकरच्या मागणीप्रमाणे अनुदान पंचायत समितीस्तरावर वर्ग करतो. त्यामुळे पाण्याच्या शुध्दतेबाबत हे दोन्ही विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. या दोन्ही विभागांकडे पाण्याच्या शुध्दतेबाबतचे रिपोर्ट नसल्याचे त्यांनीच सांगितले. कोणत्या ठिकाणाहून पाणी टँकरमध्ये भरले जाते. ते शुध्द आहे की अशुध्द आहे याची माहिती जिल्हाधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या आयुष्याशी अशुध्द पाण्याच्या माध्यमातून खेळ चालला आहे. याबाबतची तक्रार कर्जत-कोल्हारेचे विजय हजारे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकेडे २२ एप्रिल २०१६ रोजी केली होती.
जिल्ह्यात टँकरने येणारे पाणी अशुद्ध
By admin | Published: May 09, 2016 2:04 AM