कमलाकर कांबळे /नवी मुंबई, लोकमत न्यूज नेटवर्क: मागील काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सीचा मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. राज्याचे बंदरे आणि खनिजकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले. त्यामुळे बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानचा प्रवास अवघ्या ५५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. मात्र, सिडकोने १११ कोटी खर्चून नेरूळ येथे अत्याधुनिक जेट्टी बांधूनही येथून मुंबईसाठी जलवाहतूक सेवा कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा नवी मुंबईकरांना अद्यापही लागून आहे.
सागरमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून गेल्या वर्षी बेलापूर ते भाऊचा धक्का या दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू केली होती. मात्र प्रवासभाडे अधिक असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे ती बंद केली होती. आता पुन्हा तिचा प्रारंभ मंगळवारी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंसह बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सैनी, नयनतारा कंपनीचे रोहित सिन्हा यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईच्या मंत्रालयासह फोर्ट भागात विविध कामांनिमित्त दररोज ये-जा करणारे नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार असल्याचे भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तिचे प्रवासभाडेही २५० ते ३५० रुपयांच्या दरम्यान आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या जवळच रेडिओ क्लब जेट्टीवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार या जेट्टीवरून लवकरच विविध मार्गांवर जलवाहतूक सेवा सुुरू केली जाणार असल्याचे भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
असे असेल वॉटर टॅक्सीचे वेळापत्रक
वॉटर टॅक्सीच्या दिवसांतून सध्या दोनच फेऱ्या होणार आहेत. शनिवार आणि रविवार वगळता दरदिवशी सकाळी ८.३० वाजता बेलापूर जेट्टीहून वॉटर टॅक्सी सुटेल. ती सकाळी ९.३० वाजता गेटवे ऑफ इंडियाला पोहचेल. गेटवे ऑफ इंडियाहून सायंकाळी ६.३० वाजता वॉटर टॅक्सी सुटेल. ती सायंकाळी ७.३० वाजता बेलापूर जेट्टीवर पोहोचेल. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्या वाढविण्याची योजना असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मंत्र्याच्या वेळेअभावी नेरूळ जेट्टी धूळ खात
बेलापूर जेट्टीवरून गेल्या वर्षी घाईघाईत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने काही महिन्यांतच ही सेवा बंद करण्यात आली. आता गेटवे ऑफ इंडियापर्यंत विस्तार करून ही सेवा नव्याने सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी बेलापूर जेट्टीपासून अवघ्या काही अंतरावर सिडकोने १११ कोटी रुपये खर्च करून अत्यधुनिक जेट्टी बांधली आहे. परंतु उद्घाटनासाठी मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने मागील दोन वर्षांपासून ही जेट्टी धूळ खात पडून आहे.