रेल्वे प्रबंधकाच्या कार्यालयातून पाणीचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:47 AM2019-11-09T01:47:26+5:302019-11-09T01:47:53+5:30
सानपाडा स्थानकातील प्रकार : व्यावसायिकांसाठी रात्री उशिरापर्यंत कार्यालय खुले
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्थानकातील स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयातून पाण्याची चोरी होताना दिसून येत आहे. हे पाणी लगतच्या व्यावसायिकांना पुरवले जात आहे. त्याकरिता रात्री उशिरापर्यंत कार्यालय खुले ठेवले जात असल्याने त्यामागे अर्थकारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सानपाडा रेल्वेस्थानकाच्या इमारतीमध्ये व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या मार्गावरच त्यांचे साहित्य मांडले जात असून अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनीही मोकळी जागा बळकावली आहे. अशातच काही व्यावसायिकांना स्टेशन प्रबंधकांच्या कार्यालयातूनच पाणी पुरवले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्याकरिता रात्री उशिरापर्यंत स्टेशन प्रबंधकांचे कार्यालय खुले ठेवले जात आहे. सानपाडा रेल्वे स्थानकाच्या ठाणे-बेलापूर मार्गाकडील बाजूच्या तिकीट खिडकीला लागूनच स्टेशन प्रबंधकांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेरच व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याचे दिसून येत आहे.
त्यापैकी एका ज्युस सेंटरचालकाला स्टेशन प्रबंधक कार्यालयच आंदण दिल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारणे आवश्यक असतानाही रात्री उशिरापर्यंत केवळ त्यांच्यासाठी कार्यालय खुले ठेवले जात असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत तिथल्या स्टेशन प्रबंधकांच्या कार्यालयात खासगी व्यक्तींची ये-जा सुरू असते. यामध्ये एखादे गुन्हेगारी कृत्यही त्या ठिकाणी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केली आहे; परंतु सानपाडा स्थानकातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. यामुळे व्यावसायिकांना पाणी पुरवण्यामागे अर्थकारण असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तर संपूर्ण प्रकरणावरून रेल्वेच्या अधिकाºयांकडूनच स्थानकामध्ये फेरीवाले व अवैध व्यावसायिक यांना खतपाणी मिळत असल्याचे
दिसून येत आहे.