नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील काही उद्यानांमधून दिवसाढवळ्या शेकडो लिटर पाण्याची चोरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. या पाणीचोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पनवेल नगरपालिका असल्यापासून पाणीटंचाई नागरिकांच्या पाचवीलाच पूजलेली आहे. महानगरपालिका झाली तरी पाणीप्रश्न सुटलेला नाही.
नवीन पनवेल रेल्वे स्टेशनजवळील उद्यानातून पाणीचोरी केले जात आहे. पाणीपुरी, वडापाव, चायनीज विक्रेते असे अनेक फेरीवाले पाणी चोरून वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र याकडे सिडको आणि पालिका काणाडोळा करत आहे. या पाणीचोरांना अटकाव करून त्यांच्याकडून होत असणारा पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी पनवेल येथे आले होते. त्यांनीदेखील त्यावेळी पाण्याचा वापराबद्दल महत्त्वपूर्ण विधान केले होते. असे असतानादेखील पनवेल महानगरपालिका हद्दीत पाणीचोरीला अभय दिले जात असल्याचे समोर आले आहे.