कोकणातील 19 मार्गांवर जलवाहतूक होणार सुसाट, रुंदीकरण-खोलीकरणास मुदतवाढ; मेरिटाइम बोर्डास दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 07:53 AM2023-05-27T07:53:34+5:302023-05-27T07:53:46+5:30
- नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : सागरमाला प्रकल्पाअंतर्गत बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू झालेली असताना ...
- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सागरमाला प्रकल्पाअंतर्गत बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू झालेली असताना आता मुंंबई महानगर प्रदेशातील सात महानगरांसह कोकणातील १९ मार्गांवर प्रवाशांसह रो-रो पॅक्सद्वारे मालवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. मात्र, यातील बहुतांश मार्ग खडकाळ असून, अनेक ठिकाणी रेतीसह दलदल- सागरी चिखल साचला आहे. तो काढून या मार्गांच्या खाेलीकरणासह त्यांचे रुंदीकरण आणि स्वच्छतेचे काम एमएमबी अर्थात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून मात्र कूर्म गतीने सुरू आहे.
इंधनात बचत होणार
मुंंबई-नवी मुंंबईसह कल्याण- डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर-वसई आणि नजीकचे उरण, अलिबाग व कोकणातील दाभोळ, वेलदूर, आंबवणेसारख्या बंंदरांवरही चाकरमान्यांना कॅटमरान, स्पीड बोटींसह रो-रो पॅक्सने ये-जा करता येणार आहे.
सध्या भाऊचा धक्का ते रेवस, करंजा, मोरा, धरमतर मार्गावर प्रवासी जलवाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवासाचे अंतर जवळ येऊन इंधनासह वेळेचीही बचत होऊन प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.
प्रवासी वाहतुकीसाठी सुचविलेले नऊ मार्ग
भाईंदर ते घोडबंंदर
डोंबिवली ते भाईंदर
डोंबिवली ते काल्हेर
काल्हेर ते भाईंदर
कोलशेत ते भाईंदर
नारंंगी ते खरवडेश्वरी
बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया
रेडिओ क्लब ते बेलापूर/मांडवा/ मोरा-उरण
रो-रो पॅक्स मालवाहतुकीसाठी सुचविलेले मार्ग
भाईंदर ते वसई
मार्वे ते मनोरी
रेवस ते करंजा
नारंंगी ते खरवडेश्वरी
वसई ते घोडबंदर
बोरिवली ते गोराई
वेलदूर ते दाभोळ
डीसीटी ते काशीद
तोराडी ते आंबवणे
डीसीटी ते नेरूळ
संबंधित परवानगीची मुदत संपल्याने आता पुन्हा सीआरझेड प्राधिकरणाने एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत पुढील तीन वर्षे अर्थात १७ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे मेरिटाइम बोर्डास मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंंबई महानगर प्रदेशातील सात महानगरे एकमेकांना प्रवासी जलवाहतूक आणि मालवाहतुकीने जोडली जाणार असल्याने सध्याचा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरील मोठा ताण दूर होणार आहे.
शिवाय प्रवासी आपल्या कार/ दुचाकी रो-रो पॅक्स सेवेद्वारे इच्छितस्थळी नेऊन त्या त्या ठिकाणी भाड्याचे वाहन न घेता स्वत:च्या वाहनांनी फिरून पर्यटनाचा आनंद लुटू शकणार आहेत. यामुळे पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
खाड्या आणि नदी मार्गांची खोली वाढवून रुंदीकरण
अरबी समुद्रातील ठाणे खाडी, वसई खाडीसह, बाणकोट, धरमतर, नागाव, उलवा, दादर- रावे, राजपुरी, आजरा, दाभोळ, जयगड, पालशेत, कालबादेवी, मालगुंड, राजापूर, वाघोटन हे खाडी मार्ग आणि उल्हासनदी, वैतरणा नदी, तानसा नदी, काळ, कुंडलिका नदी मार्गाचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे.