मॉल्ससह हॉटेलमध्ये पाण्याची उधळपट्टी

By admin | Published: March 29, 2016 03:10 AM2016-03-29T03:10:57+5:302016-03-29T03:10:57+5:30

शहरात पाणीटंचाई सुरू असतानाही हॉटेल, मॉल्स व इतर व्यावसायिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. अनावश्यक गोष्टींसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे.

Water utility in the hotel with malls | मॉल्ससह हॉटेलमध्ये पाण्याची उधळपट्टी

मॉल्ससह हॉटेलमध्ये पाण्याची उधळपट्टी

Next

- नामदेव मोरे,  नवी मुंबई
शहरात पाणीटंचाई सुरू असतानाही हॉटेल, मॉल्स व इतर व्यावसायिकांकडून पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. अनावश्यक गोष्टींसाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात आहे. १९९९ मध्ये व्यावसायिक वापरासाठी २५ टक्के पाण्याचा वापर होत होता. १५ वर्षांनंतरही तेवढाच वापर दाखविला जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याची शंकाही उपस्थित होत आहे.
स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असतानाही नवी मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक राज्यातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये प्रत्येक नागरिकाला जास्त पाणी मिळत आहे. परंतु जवळपास दहा वर्षे गरजेपेक्षा जास्त पाणी वापरण्याची सवय लागल्यामुळे आता टंचाई असल्याची ओरड होत आहे. शहरातील सामान्य नागरिक पाण्याची उधळपट्टी करत नाही. महापालिकेने आवाहन करताच होळीला रंग उधळतानाही पाण्याचा वापर केला नाही. शहरात पूर्वी व आताही पाण्याची उधळपट्टी हॉटेल, मॉल्स व श्रीमंतांच्या वसाहतीमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जात आहे. मॉल्स व हॉटेलमध्ये प्रसाधनगृह, गार्डन व इतर अनावश्यक कारणांसाठीही पिण्याचेच पाणी वापरले जात आहे. १०० सदनिका असणाऱ्या इमारतीमध्ये जेवढा पाण्याचा वापर होतो त्यापेक्षा जास्त पाणी एका मॉलमध्ये वापरले जात आहे. मोठ्या हॉटेलमध्येही अशाचप्रकारे पाण्याचा गैरवापर सुरू आहे. वास्तविक या सर्व व्यावसायिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर केला पाहिजे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते टॉयलेट, उद्यान व इतर गोष्टींसाठी वापरण्याची आवश्यकता आहे.
पालिका प्रशासन शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी काही लिटर पाणी वाया घालवले तरी त्यांना नोटीस देत आहे. कारवाई करण्याचा इशारा दिला जातो. परंतु व्यावसायिकांकडून बिनधास्तपणे पाणी चोरी होत असतानाही काहीच कारवाई होत नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली जात नाही. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाणी साठा पुरवायचा असेल तर हॉटेल व मॉल्सच्या पाण्यामध्ये किमान पन्नास टक्के कपात केली पाहिजे. जे पाणी चोरी करत आहेत, त्यांच्यावरही कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

कळंबोली ब्रिजखाली तळे
कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल शहरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीकपात सुरू करण्यात आली आहे, तर दुसरीकडे एमजेपीच्या जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कळंबोली ब्रिजखाली मोठा डोह साचला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होऊनही एमजेपीकडून उपाययोजना होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कळंबोली आणि नवीन पनवेल नोडला पाणीपुरवठा करण्याकरिता सिडको एमजेपीकडून पाणी विकत घेते. भोकरपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्रातून या वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र एमजेपीच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. कित्येक ठिकाणी वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने पाण्याची गळती होते. कळंबोली स्टील मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सिडको वसाहतीत पाणी टंचाई सुरू असताना अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत आहे.

द्रुतगती महामार्गाच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. एमजेपीच्या जलवाहिन्या बदलण्याच्या कामाला विलंब होत असल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे पाणी बचत करण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात गळती होते याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

पाण्याचे आॅडिट
करणे गरजेचे
शहरामध्ये हॉटेल, मॉल्समधील पाण्याचे आॅडिट करण्याची गरज आहे. नक्की या ठिकाणी किती पाणी दिले जात आहे. गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर होत आहे का, चोरून नळजोडणी घेतली आहे काय याची माहिती घेणे आवश्यक आहे. मोठ्या ग्राहकांची बिले सार्वजनिक करण्यात यावीत. कोण किती पाणी वापरतो याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Water utility in the hotel with malls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.