नवी मुंबई : राज्यात सर्वत्र पाणीटंचाई सुरू असताना नवी मुंबईमध्ये मात्र पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. उद्यानामध्ये जलवाहिनी व टाकी फुटल्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे.सीवूड सेक्टर ४६ मधील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानामध्ये महापालिकेने ५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. उद्यानामधील वृक्ष व हिरवळीला पाणी देता यावे यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे; परंतु काही दिवसांपासून पाण्याची टाकी फुटली असून त्यामधून पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे.भरलेली टाकी काही वेळेतच रिकामी होत आहे. याविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तत्काळ गळती थांबविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमध्येही संपूर्ण तळ्याभोवती पाइपलाइन टाकली आहे. दोन ते तीन ठिकाणी पाइप फुटले असून तेथूनही पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे.शहरातील दुभाजकांमधील हिरवळीलाही टँकरद्वारे पाणी दिले जात असून हजारो लिटर पाणी व्यर्थ होत आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती असून नवी मुंबई महानगरपालिकेनेही पाण्याचा जपून वापर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिका उद्यानात पाण्याचा अपव्यय सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:28 PM